साईमत धुळे प्रतिनिधी
वेगवेगळ्या प्रकारणांमुळे संवेदनशील झालेल्या धुळे शहरात गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतूसे घेऊन फिरणाऱ्या युवकाच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडून सुमारे २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तो जप्त केला आहे.
मुजाहिद अहमद (३३, रा. देविका मल्ला, आदम नगर, मालेगाव) असे या युवकाचे नाव आहे. हा युवक गावठी बंदूक विक्रीच्या उद्देशाने धुळे तालुक्यातील आर्वी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावालगत असलेल्या लकी स्टार हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून मुजाहिदला ताब्यात घेतले. अंगझडतीत सुमारे २५ हजार रुपयांची गावठी बंदूक तर दोन हजार रुपयांचे दोन जिवंत काडतूस असा २७ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्याला लागत आपल्या ताब्यात घेतले आहे.