बाजार समितीच्या मतमोजणीमुळे परिसर प्रभावित रुग्णांना फटका; ढोल ताशे, फटक्यांनी शांतताभंग

0
11

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

शहरातील थोर सन्मित्र मंगल कार्यालयात रविवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीसह निकाल लागणार होता. या निकालाने इंडिया गॅरेज परिसर गजबजून गेला होता.या परिसरात मोठ्या प्रमाणात दवाखाने असल्याने हा परिसर प्रभावित झाला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय झाली होती तर परिसरातील नागरिकांनाही सुटीच्या रविवारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. निकालानंतर फटाके व ढोल ताशांमुळे परिसर प्रभावीत झाला तर विविध हॉस्पिटल्समुळे संवेदनशील असलेल्या या भागात निकाल न ठेवता अन्यत्र ठेवायला हवा होता, असे मत काही वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.

शहरातील इंडिया गॅरेज ते शिंपी बोर्डींग हा रस्ता जिल्हा पेठ परिसरातील मुख्य रस्ता आहे.परिसरातील सिंधी कॉलनी रोड, ढाके वाडी परिसर, नाथवाडा, कंजरवाडा, पंचमुखी हनुमान परिसर तसेच जिल्हा पेठ परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय, गिरणा कार्यालय,पोलीस वसाहत, आकाशवाणी ते कोर्ट चौक रस्त्याला व नवीन बस स्टॅण्डला जोडणारा मुख्य रस्ता आहे.या परिसरातीलच सन्मित्र मंगल कार्यालयात बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी व निकाल प्रशासनातर्फे आयोजित केल्यामुळे या रस्त्यावर व परिसरात जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद होता.

पर्यायी मार्गही अडचणीचे
थोर सन्मित्र मंगल कार्यालयाच्या चहूबाजूचे रस्ते गर्दीने फुल्ल होते तर या रस्त्यांवर पोलीस प्रशासनातर्फे बॅरिगेटस्‌‍‍ लावून रस्ते बंद करण्यात आले होते. निकालासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांनी रस्ते भरुन गेले होते.या रस्त्याच्या पर्यायी रस्त्याने गेल्यावर त्या रस्त्यांवर अमृत योजनेंतर्गत रस्ताभर चेंबर्सची कामे सुरु असल्याने वाहनचालकांना जिकरीचा सामना करावा लागला. नागमोडी वळणे घेत वाहन चालवावे लागत असल्याची डोकेदुखी निर्माण झाली होती.

रुग्णांना फटका
इंडिया गॅरेज परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स्‌‍‍ आहेत. तेथील रुग्णांना याचा फटका बसला.एका हॉस्पिटलमध्ये गुडघेदुखीसाठी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तेथून निवडणूक निकाल जवळच असल्याने गर्दीमुळे बाधीत रुग्णांना वाहनाने हॉस्पिटलपर्यंत येणे शक्य नसल्याने त्यांना गर्दीतून वाट काढत पायपीट करत गुडघ्यांच्या असह्य वेदनांसह हॉस्पिटल गाठावे लागले. काही इर्मजन्सी रुग्णांना अन्यत्र जावे लागले.रुग्णालय परिसर हा शांत असायला हवा मात्र निवडणूक निकालानंतर ढोल ताशे, जयघोष, फटाक्यांच्या आतषबाजीने येथील शांतता भंग पावली होती.अशा वेळी एखाद्या अत्यवस्थ रुग्णाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही विचारण्यात येवून निकाल अन्यत्र ठेवावयास हवा होता असा सूर उमटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here