साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :-
शहर पोलिसांकडून जिल्हा दूध संघाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संघात जाऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघाने दाखल केलेल्या तक्रारीची अजूनही नोंद झाली नाही आणि याचाच जिल्हा दूध संघात तपास सुरू आहे. पोलिस नेमका कशाचा तपास करीत आहे. त्यांनी दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जावीत; परंतु गुन्हा आगोदर नोंद करावा, याबाबत आम्ही न्यायालयात अवमान याचिकाही दाखल केली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
पुढे खडसे यांनी सांगितले की, जिल्हा दूध संघात पोलिस पाच वर्षांच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. वास्तविक हा चोरीचा गुन्हा आहे, मग त्या अनुषंगाने त्यांनी केवळ स्टॉकची तपासणी करावी, त्यांना पाच वर्षांतील कागदपत्रे कशासाठी हवी आहेत. तसेच, न्यायालयाने आदेश दिला आहे, की त्यांना कागदपत्रे हवी असल्यास त्यांनी प्रत्येक कागदाची झेरॉक्स करून त्यावर पोलिस ठाण्याचा शिक्का मारून त्याची पोच देऊन ती घेऊन जावीत. पोलिसांना आमचे कागदपत्रे देण्यास कोणताही नकार नाही; परंतु त्यांनी प्रथम आम्ही दाखल केलेला चोरीचा गुन्हा दाखल करावा त्यानंतर आवश्यकता वाटल्यास दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जावीत, असेदेखील खडसे यांनी नमूद केले आहे. दरम्यान, न्यायालयाने जो आदेश दिला आहे, त्याप्रमाणे पोलिस कारवाई करीत नाही, असा आरोपही खडसे यांनी केला. आम्ही पोलिसांविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. सध्या न्यायालयाला दिवाळीची सुट्टी आहे. त्यानंतर आम्ही केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होईल, असे यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले.