मुंबई : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण जाहीर केले. त्यात बँकेने रेपो दरात 0.50 टक्के वाढ केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. गेल्या महिन्यात बँकेने अचानक व्याजदर वाढवला होता. त्यापार्श्वभूमीवर आज बुधवारी गव्हर्नर शक्तिकांत दास कर्जदारांना धक्का देत रेपो वाढीची घोषणा केली.
या दरवाढीनंतर रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलीटी रेट 4.15 टक्के झाला होता. बँक रेट 4.15 टक्के आणि सीआरआर अर्धा टक्क्याने वाढून 4.50 टक्के झाला. त्यापूर्वी 8 एप्रिल 2022 रोजी रिझर्व्ह बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते.
आरबीआय पतधोरण समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत रेपो दरात आणखी 0.40 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज ब्रोकरेज संस्थांनी व्यक्त केला आहे. याशिवाय ऑगस्टच्या आढाव्यात ते 0.35 टक्क्यांनी वाढू शकते. असे न झाल्यास आरबीआय पुढील आठवड्यात 0.50 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.25 टक्के वाढ करण्याचे ठरवू शकते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच सांगितले होते की, चलनवाढीचा दर 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर आणण्याचा दबाव पाहता, पॉलिसी रेट वाढण्याची शक्यता वाढली आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होईल कारण बँकांच्या कर्जाची किंमत वाढेल. रेपो रेट हा दर आहे ज्यावर बँका आरबीआयकडून पैसे घेतात. हा दर वाढल्यावर बँकांना जास्त दराने कर्ज मिळेल, त्यामुळे ते त्यांच्या ग्राहकांकडून जास्त दराने व्याजही घेतील.
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच काल मंगळवारी एचडीएफसी बँकेने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेनं एमसीएलआर दर (कर्जदर) 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे. 7 जून 2022 पासून नवीन कर्जदर लागू झाला असल्याचे एचडीएफसी बँकेनं म्हटले आहे. या दरवाढीने कर्जाचा मासिक हप्ता वाढेल. त्याशिवाय गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच वैयक्तिक कर्ज आणि इतर नवीन कर्ज जादा दराने घ्यावे लागणार आहे.
दरम्यान, 4 मे रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला होता. रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आता जाणवत असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले होते.



