जळगाव ः प्रतिनिधी
मोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांकरिता प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. यात जिल्ह्यातील 594 विद्यार्थांचा समावेश आहे. 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावयाचे असून गुरुवारपर्यंत 346 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. दरम्यान,आज शुक्रवारी प्रवेशाची अंतिम मुदत असून आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी 2173 विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्चित केला.
तर प्रतीक्षा यादीतील 594 विद्यार्थ्यांपैकी 346 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी, सदर अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन नजीकच्या गटसाधन केंद्र पंचायत समिती व शहरासाठी मनपा शिक्षण मंडळ कार्यालय येथे संपर्क साधून आपल्या बालकाचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा.