फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी
येथील नगरपालिकेतील आरोग्य विभागात लाखो रुपये किमतीच्या साहित्य खरेदीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशन व वरिष्ठांकडे तक्रार देऊन दोन महिने उलटूनही दखल न घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
फैजपुर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात लाखो रुपये किमतीचे साहित्य खरेदी करण्यात आले. त्यात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. चावरे यांच्या भावाची फैजपूर येथील धर्मदाय रजिस्टर संस्था मेहतर वाल्मीक जनकल्याण सेवा या संस्थेला ठेका दिला गेला. नगरपालिकेने बिलाची शहानिशा न करता तसेच मालाची तपासणी न करता सुमारे 5लाख 40 हजार 850 रुपये बिल संबंधित संस्थेला अदा करण्यात आले. त्यात टॉयलेट व इतर वस्तूंच्या खरेदीमध्ये वस्तूंच्या अव्वाच्या सव्वा किमती लावणे, पक्क्या बिलामध्ये हजारो रुपयांची तफावत, बिलावर तारीख, कोणाच्या नावे बिल, घेणारा व देणाऱ्याची सही आदी गंभीर चुका असताना लेखापाल व मुख्याधिकाऱ्यांनी बिल तात्काळ पास करून संबंधितांना रक्कम अदा केली.
संबंधित संस्थेला बिलाची रक्कम अदा करून तब्बल एक महिना उलटूनही नगरपालिकेत आरोग्य विभागात खरेदी करण्यात आलेले साहित्य दिसून आले नाही. सध्या प्रशासक राज असून सारे आलबेल असल्यीची चर्चा आहे. ‘आंधळं दळतो आणि कुत्रं पीठ खात’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या संदर्भात येथील माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी फैजपूर पोलीस स्टेशन तसेच वरिष्ठांना तक्रार अर्ज दिले आहे मात्र दोन महिने उलटूनही चौकशी व कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तात्काळ चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.