जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह,महाबळ,जळगाव येथे काल झाली. आचार्यदादांनी घालून दिलेल्या कार्यपद्धती, नितीमूल्य, कार्यतत्परता या आदर्शावर बँकेची प्रगती सुरू असून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
सभेच्या सुरवातीस बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ.अविनाशदादा आचार्य यांचे स्मरण करून सर्व संचालक व उपस्थित सभासदांनी स्व. दादांना आदरांजली अर्पण केली.या सभेत सन 2021-2022 या वर्षासाठी 10 टक्के लाभांश देण्यास मंजूरी घेण्यात आली
ज्या सभासदांना सभेस प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसेल अशा सभासदांसाठी सभेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्था देखील बँकेच्या वतीने करण्यात आली होती. दिलीप चौधरी यांनी म्हंटलेल्या वंदेमातरमने सभेस सुरुवात करण्यात आली. सुरुवातीस अहवाल काळात दिवंगत झालेल्या महनिय व्यक्ति व सभासदांना बँकेच्या संचालिका डॉ. सौ.आरती हुजुरबाजार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
अध्यक्षीय मनोगत
बँकेच्या प्रगतीत बँकेच्या कर्मचारी वर्गाने अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. सर्व कर्मचारी वर्ग विपुल परिस्थितीत न डगमगता जोमाने काम करीत चांगली कामगिरी केल्यामुळेच बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचवला आहे. कोरोना काळात बँकेचे सुमारे 141 कर्मचारी बाधित झाले व 2 कर्मचारी बँकेने गमावले आहे परंतु अशा परिस्थितीत देखील कर्मचारी वर्गाने उत्तम कामगिरी केली आहे. कर्मचारीसह त्यांची पत्नी यांचेसाठी बँकेने कोरोना आजाराच्या अनुषंगाने मेडीक्लेम पॉलिसी काढली होती याचा फायदा कोरोना बाधित झालेल्या कर्मचारी वर्गाला झाला.
बँकचे संचालक मंडळ हे केवळ उच्च शिक्षित व व्यावसायिक क्षेत्रातील नसून त्यांना सामाजिक जाणीव व आर्थिक क्षेत्रातील अनुभव असल्याने बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असून संचालक मंडळातील सर्व निर्णय हे सामूहिक प्रक्रियेने घेतले जातात त्यामुळे त्यात पारदर्शकता असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
बँक यापुढे देखील आलेल्या आव्हानांना सामोरे जाऊन अधिक वेगाने प्रगती करेल व इतर बँकांसाठी आदर्श निर्माण करेल असा आत्मविश्वास बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच अनिल राव यांनी आपल्या मनोगतात पुढील काही बाबींचा प्रामुख्याने उल्लेख केला.
व्यावसायिक प्रगती
सर्वांच्या सहकार्याने व निरंतर विश्वासाच्या बळावर बँकेने 3000 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे तसेच नेट एन.पी.ए.देखील 0 टक्के राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.बँकेने सर्व कायदेशीर बाबींचा अवलंब करीत कर्जाची थकबाकी नियंत्रणात आणून एन.पी.ए.चे प्रमाण 0 टक्के ठेवण्यात यश प्राप्त केले आहे.
लहान व्यासायिकांच्या उभारणीवर भर
बँक मोठे कर्ज वितरण करण्याच्या ऐवजी लहान व्यवसायिकांना कर्ज वितरणावर भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.बँक केवळ आकड्यांनी प्रगती करण्यावर भर देत नसून आतून सक्षम होत जळगाव जनता सहकारी बँक ही छोट्या लोकांची मोठी बँक अशी बँकेची ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या लहान व्यावसायिकांना मदतीची गरज होती अशा वेळी हातावर पोट आसणाऱ्या लहान व्यावसायिकांना शोधून त्यांना स्वयंसिद्ध, अंत्योदय,उत्कर्ष,शतायुशी,शारदा,बचतगट यासारख्या कर्ज योजनांच्या माध्यमाने छोटी छोटी कर्ज वाटप करून त्यांना व्यवसायात उभारणीसाठी बँकेने मदत केली आहे.
बचत गटांच्या महिलांना देखील स्वत:च्या पायावर उभे करून स्वयंभू होण्यासाठी बँकेने कर्जवाटप केले आह. बँकेचे आज 3735 महिला बचत गट असून त्याद्वारे सुमारे 63 हजार महिला बँकेशी जोडल्या गेल्या आहेत. बचतगटांच्या कर्जाची थकबाकी देखील शून्य आहे.
आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर
कोरोना काळात बँकेच्या ग्राहकांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील वाढला आहे. मागील वर्षी सुमारे 99.65 लाख ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार केलेत व हे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासोबत त्याबाबत असलेली जोखीम देखील बँकेच्यावतीने उत्तमरित्या सांभाळली जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या वतीने आखून देण्यात आलेले सर्व निकष देखील बँकेने पूर्ण केले असल्चाचे अध्यक्ष प्रा.राव यांनी सांगितले.