कृषी खाते शेतकऱ्यांच्या पाठीशी; शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचे पालन करावे : आवाहन

0
29

जळगाव : प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये बोगस बियाणे आणि खतांचे प्रमाण वाढले असून याला आळा घालण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजीत खरीप पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी ना. पाटील यांनी शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया आणि किटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. एक गाव – एक वाणच्या अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. रासायनिक खतांच्या संतुलीत वापरासाठी ठिबक सिंचनातून खत देणे, माती पृथ:करणावर आधारित खतांसह कृषक ऍपचा वाप करावा. आंतरपीक आणि मिश्रपीक पध्दतीवर भर द्यावा आणि आयसीएम म्हणजेच एकात्मीक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. या पंचसूत्रीचा वापर केल्यास शेतकरी अधिक चांगल्या पध्दतीत पिके घेऊ शकतील असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. तर खते आणि किटकनाशकांच्या उपलब्धतेसाठी कृषी खात्याने प्रचारतंत्राचा योग्य तो वापर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे, आमदार शिरीष चौधरी,चंद्रकांत पाटील, लताताई सोनवणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता चंद्रकांत दळवी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता वाय. के. भदाणे, प्रकल्प उपसंचालक के. एल. तडवी, आत्मा समितीचे अध्यक्ष पी.के. पाटील, तेलबिया संशोधक डॉ. संजीव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी हेमंत बाहेती आणि महेश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सिंगर सुपर फॉस्फेट व एसएसपी यांच्या प्रचार व प्रसिध्दीचे तसेच इफकोच्या नॅनो तंत्रज्ञान प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. नंतर नियोजन भवनाच्या आवारातील कृषी प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनाची पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी पाहणी केली. सभागृहात आढावा बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बॅनर, पोस्टर आणि घडी पत्रीकेचे विमोचन करण्यात आले. त्यात जिल्हा कृषी कार्यालयाचा अहवाल, कृषी विकास आधिकारी जळगाव यांनी तयार केलेली पत्रीका, कृषी विभाग व ममुराबाद कृषी विज्ञान केंद्र यांच्या घडीपत्रीका, कृषी विज्ञान केंद्र ममुराबादचे पोस्टर व घडीपत्रीका, कृषी विज्ञान केंद्र पाल आणि जिल्हा मृद चाचणी व सर्वेक्षण अधिकारी यांच्या पत्रीकांचे प्रकाशन करण्यात आले.
विविध पुरस्कारार्थींचा सत्कार
याप्रसंगी विविध पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला. त्यात 2017 सालच्या कृषी भूषण पुरस्काराने सन्मानीत उमरे ता. एरंडोल येथील समाधान दयाराम पाटील, 2017 सालच्या उद्यान पंडीत पुरस्काराने सन्मानीत जामनेर येथील रवींद्र माधवराव महाजन व 2018 सालच्या कृषीभूषण ( सेंद्रीय शेती) पुरस्काराने सन्मानीत करंज ता. जळगाव येथील अनिल जीवराम सपकाळे यांचा समावेश होता. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेच्या अंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या दिनेश मधुकर बोरसे ( चिंचखेड, ता. चाळीसगाव )- केळी प्रक्रिया; कामिनी योगेश साळुंखे ( कोळन्हावी, ता. यावल)- दुग्ध प्रक्रिया आणि पिंप्री खुर्द ता. धरणगाव येथील चंद्रकांत देवीदास चौधरी- पापड उद्योग यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अंतर्गत जळके ता. जळगाव येथील श्रीमती अनिता ज्ञानेश्‍वर पाटील यांना दोन लक्ष रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरीसाठी कृषी खात्यातील अधिकार्‌यांचा सत्कार करण्यात आला. यात चोपडा येथील कृषी सहायक दिनेश देवीदास पाटील; जामनेर येथील कृषी सहायक सचिन अशोक पाटील आणि कृषी उपसंचालक अनिल वसंतराव भोकरे या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, खरीप हंगाम 2022-23 या वर्षात शेतकर्‌यांनी कृषी खात्याने आखून दिलेल्या पंचसूत्रीचा अवलंब करावा. यात प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया आणि किटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. एक गाव एक वाणच्या अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. रासायनिक खतांच्या संतुलीत वापरासाठी ठिबक सिंचनातून खत देणे, माती पृथ:करणावर आधारित खतांसह कृषक ऍपचा वाप करावा. आंतरपीक आणि मिश्रपीक पध्दतीवर भर द्यावा आणि आयसीएम म्हणजेच एकात्मीक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. या पंचसूत्रीचा वापर केल्यास शेतकरी अधिक चांगल्या पध्दतीत पिके घेऊ शकतील असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा तयार कराव्यात. याशिवाय लावगडीसाठी भांडवलाची आवश्‍यकता असते ही बाब लक्षात घेता बँकांनी लवकरात लवकर पीककर्जाचे वाटप करावे,असे निर्देशही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जैविक खतांचा वापर वाढवावा. दरम्यान, बोगस बियाणे आणि खतांचा मुद्दा हा संवेदनशील असून प्रामुख्याने मध्यप्रदेशला लागून असणार्‌या भागातून बोगस बियाणे येत असल्याने कृषी खात्याने दक्ष असावे असे निर्देशही त्यांनी दिलेत.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बैठकीत कृषी खात्यातर्फे करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. जिल्ह्यात 27 लाख 50 हजार पाकिटे कपाशी बियाण्यांचे नियेाजन आहे. यात वितरकांकडे 10 मे पर्यंत बियाणे येणार असून 1 जून 2022 नंतर हे बियाणे प्रत्यक्ष शेतकर्‌यांना उपलब्ध होणार आहेत. तसेच जिल्ह्यात 1 लाख 33 हजार 482 मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शिवाय 11 हजार 682 मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विकेल ते पिकेल यावर्षी जिल्ह्यात बी-बीयाणे, खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बैठकीत दिली.
जिल्ह्यात सन 2022 – 23 या वर्षात मनरेगा अंतर्गत 330 एकर तर इतर योजनेअंतर्गत 130 अशा एकूण 460 एकरात तुतीची म्हणजे रेशीमची लागवड होणार आहे. यासाठी 2 कोटी 37 लक्ष रुपये खर्च येणार असून यातून 16 हजार 880 क्विंटल कोष उत्पादनचा अंदाज असून उत्पादन सुमारे 80 कोटी 88 लक्ष रूपयांचे अपेक्षित आहे.
16 भरारी पथकांची स्थापना
दरम्यान, सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणार्‌या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरिक्षक निहाय व महिना निहाय नियोजन केलेले आहे जिल्ह्यात 1526 बियाणांचे नमुने 673 खतांचे नमुने व 395 कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असून जिल्ह्यातील बियाणे खते व कीटक नाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती देखील संभाजी ठाकूर यांनी याप्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन कृषी उपसंचालक अनिल भोकरे. यांनी केले तर आभार पोकराचे कृषी अधिकारी संजीव पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here