जळगाव ः प्रतिनिधी
आपल्यावर निस्वार्थी प्रेम फक्त आई-वडिलच करु शकतात, त्यांच्या प्रेमाचा नेहमी आदर करा, दर महिन्यातून एकदा तरी त्यांची भेट घ्या, त्यांच्याजवळ राहा, जन्मदात्यांचे आशिर्वाद घ्या, दुसऱ्या मोठ्या शहरात जाऊन वैद्यकीय सेवा देण्यापेक्षा जन्मभूमीतच वैद्यकीय सेवा द्या, तिथे जे स्पेशालिस्ट डॉॅक्टर्स नाहीत, त्याचे पुढे शिक्षण घ्या, हार्डवर्क करा आणि जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवतं यशस्वी व्हा असा कानमंत्र पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.तात्याराव लहाने यांनी दिला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात काल आयोजित दिक्षांत सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांची विशेष उपस्थिती होती, याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.सुहास बोरोले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.माया आर्विकर, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील हे उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रगीत तद्नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रार्थना आणि मान्यवरांच्याहस्ते धन्वंतरी पूजनाने दिक्षांत सोहळ्यास प्रारंभ झाला. डॉ.माया आर्विकर यांनी कनव्होकेशन सुरु झाल्याचे जाहिर करताच भावी डॉक्टरांनी जल्लौष केला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्यासमवेत डॉक्टर्स उपस्थीत होते. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून तब्बल 147 डॉक्टर्स आज पदवी संपादन करुन वैद्यकीय सेवेसाठी बाहेर पडले असल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आर्विकर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात, याप्रसंगी काहींनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री गुंडेटी, विक्रांत गायकवाड, अमित साखरे, रुहान भुतडा, बुशरा खान, नाझील मोहम्मद यांनी केले.
पाल्यांची तुलना इतरांशीन करता त्यांना त्यांच्या आवडीचे उच्च शिक्षण घेऊ द्या, असे आवाहनही पद्मश्री डॉ.लहाने यांनी केले.
टॉपर्सचा गौरव
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय व अंतिम वर्षातील टॉपर्सचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानचिन्ह, रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्व.वासुदेव पाटील पुरस्कार, डॉ.एन.एस.आविकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात डॉ.मितेश दामले, डॉ.अनुष्का गर्गे, डॉ.फोरम नीरव मातालिया, डॉ.सिद्धी धिंग्रा, डॉ.अनुपमा पाराशर, डॉ.भुपेंद्र पटेल, डॉ.भारती राजपाल, डॉ.प्रियंका पंड्या, डॉ.समृद्धी पाथरे आणि डॉ.अनुष्का कोचर यांचा समावेश होता.