फैजपूर ता.य़ावल ः उमाकांत पाटील
गेल्या वर्षभरापासून यावल व रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान, केळी घडांची चोरी, ठिंबक संच नळ्यांची चोरी, विहिरीतील केबल चोरी, स्टार्टर्, डीपी कॉईल व ऑइलची चोरी अशा अनेक समस्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. उभ्या पिकात गुरेढोरे चारण्याचा प्रकार नित्याचाच असून गावातील ठेंगे संस्था, विविध कार्यकारी सोसायटी, पोलीस पाटील यांच्यासह परिसरातील पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊन सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. उलट चोरीचे व कापणीवर आलेल्या केळीच्या खोडांचे नुकसान करण्याचे सत्र सतत सुरू आहे.
चिनावलसह परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रश्नी सावदा येथील बस स्थानकासमोर चौकात नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी घेऊन परिसरातील शेकडो शेतकरी, आमदार शिरीषदादा चौधरी, खासदार रक्षाताई खडसेंसह महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज उपस्थित होते. या ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वतीने अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून व्यथा मांडल्या.अर्ज फाटे करूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याने आम्ही न्याय कुणाकडे मागावा ? अशी याचनाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
चोरांना पकडूनही पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलीस प्रशासन कुचकामी ठरत असल्याने आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन जागेवरून उठणार नाही अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी यावेळी घेतली. सावदा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली.
यावल -रावेर तालुक्यातील फैजपूर, आमोदा, भालोद, पाडळसा, बामनोद, न्हावी, चिनावल, सावदा, रोझोदा, कोचुर, खिरोदा, वाघोदा, मस्कावद आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाढवळ्या पिकात गुरे घालून चारण्याचा प्रकार, केळी व अन्य भाजीपाला चोरून रेल्वे मार्गाने वाहून नेणाऱ्या टोळ्यांकडून सर्रासपणे पीक चोरी करणे, शेतकऱ्याने त्यांना हटकल्यास त्यांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वारंवार पोलीस प्रशासनाला कळवूनही हे प्रकार बंद होत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले. गेल्या अनेक दिवसांपासून हे सत्र नियमित सुरू असताना हेतुपुरस्कर दुर्लक्ष होत आहे.
या विभागातील लोकप्रतिनिधींचा पोलीस प्रशासन तसेच अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही, असा आरोप करून त्यांचे सर्व काही आलबेल होत असून शेतकरी मात्र सर्व बाजूने भरडला जात आहे. यापुढे मात्र शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत आता कोणीही पाहू नये अशी संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ दिली.संबंधित प्रशासनाने योग्य चौकशी करून चोरांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
चोरीचे सत्र सुरुच
“रविवारी रात्री बामणोद येथील राजेंद्र गोपाळ राणे यांच्या बामणोद- आमोदा रोडवरील शेतातील हरभरा चोरीला गेला. मालक स्वतः 1.30 वाजे पर्यंत रात्री राखण केली. तद्नंंतर जवळपास एक बिघा हरभरा चोरीस गेला. तर दुसऱ्या प्रकरणात सावदा येथील विकास त्रंबक पाटील यांच्या मालकीच्या सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या दोन गीर गाईंची चोरी झाली आहे.