साईमत, धुळे, प्रतिनिधी,
एसटी महामंडळाच्या चालकांची 3 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला ‘अल्को टेस्ट’ मशिनद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात चालकांच्या तपासणीत धुळे विभागातील 9चालक मद्यप्राशन करून कामावर आढळले. सर्व मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे. एसटी चालकांनी मद्यप्राशन करून कामावर राहणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या हातून अपघात घडण्याची दाट शक्यता असते. काही एसटी बसचालक मद्यपान करून वाहन चालवीत असल्याच्या तक्रारी झाल्या. विशेषत: ज्या बस रात्री मुक्कामी जातात अशांच्या बसचालकांबाबत या तक्रारी जास्त होत्या.
त्याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांना 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर, असे दोन दिवस एकाच वेळी चालकांची ‘अल्को टेस्ट’ मशिनद्वारे तपासणी करण्याची सूचना दिली. त्यानुसार राज्यात एकाच वेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेत धुळे विभागात नऊ चालक ड्यूटीवर असताना मद्यप्राशन केलेले आढळले. दोषी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई केली आहे.दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बस स्थानकात शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर आगारातील बसचालक मद्यधुंद अवस्थेत आढळला. विनोद विठ्ठलराव पोपटे (रा. मुकुंदवाडी, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.त्याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बस पहाटे अक्कलकुवा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यास निघाली असता, राज्य परिवहन महामंडळातर्फे चालकांच्या मद्यपानबाबतच्या तपासणीत बसचालक पोपटे मद्यधुंद आढळले.