कडाक्याच्या थंडीसह अनेक समस्यांचा सामना करत ठरला चॅम्पियन
साईमत /ता. यावल /प्रतिनिधी :
जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर डोंबिवलीतील अवघ्या आठ वर्षांच्या ओम कुणाल भंगाळे याने न्हावीकर (ता. यावल) व डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याने मुंबईतील अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे १७ किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या २ तास ३३ मिनिटांत पार केले आहे.
ओम डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसरीत शिकतो. यश जिमखान्यात प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तो जलतरणाचे धडे गिरवत होता. विशेष म्हणजे, या मोहिमेपूर्वी ओमला समुद्रात पोहोण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही त्याची जिद्द पाहून त्याचे आई-वडील आणि आजोबांनी त्याला पाठिंबा दिला. या मोहिमेसाठी प्रशिक्षक विलास माने, रवी नवले आणि संतोष पाटील यांनी त्याच्याकडून दररोज ३ ते ४ तास कठोर सराव करून घेतला होता.
८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून २३ मिनिटांनी ओमने अटल सेतू येथून समुद्रात झेप घेतली. ही मोहीम सोपी नव्हती; पहाटेची कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, मोठ्या जहाजांच्या लाटा आणि समुद्रातील तेलकट पाणी अशा अनेक आव्हानांचा त्याने सामना केला. तेलकट पाण्यामुळे मळमळ्यासारखे होत असतानाही त्याने आपली गती कमी होऊ दिली नाही. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली त्याने हे १७ किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले.
ओम गेटवे ऑफ इंडियाला पोहोचताच त्याचे प्रशिक्षक, नातेवाईक आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. एवढ्या कमी वयात त्याने केलेल्या या कामगिरीचे सगळ्यांनीच कौतुक केले. ओमचे पुढील ध्येय आता धरमतर (अलिबाग) ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे सागरी अंतर पार करण्याचे आहे.
