शहरात येणारा ७० किलो गांजा पकडला

0
2

साईमत मलकापुर प्रतिनिधी

खामगांवकडून मलकापुरकडे घेवुन जाणार ६९ किलो ५०० ग्रॅम गांजा मलकापुर पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे. सदर कारवाईत ८ लाख २६ हजार ८०० रुपये किंमतीच्या गांजासह एक सुझुकी कंपनीची कार अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण १३ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.

खामगांवकडून मलकापुर शहरात विक्रीसाठी गांजा आणला जाणार असल्याची गुप्त माहिती मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनी पंजाबराव शेळके, डिबी पथकाचे के.पी तायडे, आसिफ शेख, प्रमोद राठोड, ईश्वर वाघ,गोपाल तारुळकर, प्रविण गवई,आनंद माने, गोपाल इंगळे, मंगेश चरखे आदी गस्तीवर असतांना सदर बातमीची पडताळणी करून कारवाई करण्याचे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी यांनी आदेशित केले.

तदनंतर पोनि अशोक रत्नपारखी आपल्या गस्तीपथकासह राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ वरील खामगांव – मलकापुर रोडवरील कन्हैय्या हॉटेलच्या बाजुला पोहचुन वाहनांची तपासणी करत असतांना एक सुझुकी कंपनीची कार कन्हैय्या हॉटेलच्या परिसरात पार्क केलेली दिसली व त्यातील दोन इसम वाहनाच्या पाठीमागे उभे होते. त्यांनी पोलीसांना पाहून पळ काढला असता त्यातील एका इसमास पोलीसांनी जागीच पकडले त्याची विचारपूस केली असता तो सुरुवातील उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला होता, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटा सारखा बोलू लागला त्याने त्यांचे नाव अजयकुमार नित्यानंद भत्रा (वय २६ राहणार आरएससी- १४ धारागुडा जि. मलकानगिरी राज्य ओडीसा ) असे सांगितले.
त्यांचे कडुन ६९ किलो ५०० ग्रॅम वजनाचा अंदाजे ८लाख २६ हजार ८०० रुपयांचा गांजा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक सुझुकी कंपनीची कार ( क्रमांक ए.पी-३५ एस. २३४७ ) किंमत अंदाजे ५ लाख रुपये असा एकूण १३ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी मलकापुर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here