पांझरा नदीकाठच्या नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
जिल्ह्यात संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. सततच्या पावसाने साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे. अक्कलपाडा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता प्रकल्पाचे ७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून ५ हजार २३० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हा विसर्ग सोमवारी, ७ जुलै रोजी पहाटे ४ वाजेपासून टप्प्याटप्याने वाढविण्यात आला आहे. पाण्याची आवक पुढेही वाढल्यास, पूर्वसूचनेनुसार विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या पांइम्रा, मालनगाव व आमोडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची भर पडत आहे.
नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन पांझरा नदीच्या दोन्ही काठावरील गावातील नागरिक तसेच धुळे शहरवासियांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी,” असे आवाहन अक्कलपाडा प्रकल्प उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आणि धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.