जळगावचा संघ राहिला अजिंक्य, चार गटातून २० संघाचा सहभाग
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी
जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या पटांगणावर ५१ वी कुमार गट जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. स्पर्धेसाठी चार गटातून २० संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना हा कैलास क्रीडा मंडळ, जळगाव आणि जय मातृभूमी क्रीडा मंडळ, भुसावळ यांच्यात झाला. हा सामना जळगावच्या संघाने जिंकला.
स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी २० खेळाडूंची निवड केली आहे. त्यांचा सराव जळगाव येथे केला जाणार आहे. बारा खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रतिनिधीत्व करतील. अंतिम सामन्यातील विजेत्या व विजेत्या संघाला कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, प्रमुख पाहुणे भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेवक संतोष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव इंगळे, जळगाव जनता बँकेचे संचालक जयंती सुराणा, राजेश सुराणा, समीर पाटील, विजय नेमाडे, मंगेश पाटील, भागवत सावकारे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
स्पर्धेसाठी पंचप्रमुख म्हणून बी.एन.पाटील, सहाय्यक पंचप्रमुख म्हणून सुनील राणे, निरीक्षक म्हणून महेश गुटी यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू, पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.यासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य मिळाले.