साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
राज्यभरातील परिचारिकांनी गुरूवारी, १७ जुलै रोजी विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारला होता. त्यात नर्सिंग भत्ता मिळावा, वेतन त्रुटी दूर व्हाव्यात आदी मागण्या परिचारिकांकडून केल्या होत्या. मात्र, जळगाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत ३५० परिचारिकांनी संपात सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्यांनी संपातून माघार घेतल्याचे दिसून आले.
जिल्ह्याभरात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कार्यरत परिचारिकांनी संपात सहभाग न घेता घोषणा झाल्यानंतही जिल्ह्याभरात सेवा दिली आहे. परिचारिकांनी संपात सहभाग न घेतल्याने आरोग्य सेवेवर कोणताही विपरित परिणाम झाला नाही. परिचारिकांची दिवसभर अविरत सेवा सुरू होती. शासनाकडून याबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्याने परिचारिकांनी संप पुकारला होता.
सर्व आरोग्य केंद्रातील परिचारिकांनी दिली सेवा
अशातच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत परिचारिकांनी संपाकडे पाठ फिरवून रुग्ण सेवेला प्राधान्य दिले. मागण्या मान्य न झाल्यास १८ जुलैपासून काम बंदचा इशारा परिचारिकांनी दिला आहे. मात्र, जिल्ह्यातील परिचारिका त्यात सहभागी झालेल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर विशेषतः ग्रामीण भागात परिणाम दिसून आला नाही. जिल्ह्यात २२२ नियमित तर ९६ कंत्राटी परिचारिका कार्यरत आहे. गुरुवारी जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत परिचारिकांनी संपात सहभाग नोंदविला नाही. सर्व आरोग्य केंद्रातील परिचारिकांनी सेवा दिली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले.
