मान्यवरांच्या हस्ते मालकी हक्काचे सिटीसर्व्हेचे उताऱ्यांचे वाटप
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी
शहरात गेल्या तीस वर्षांपासून नेहरूनगर, रामदेवजी बाबा नगर, हमाल वाडा, संजय नगर, मरीआई परिसर, गौतम नगर, बालाजी मंदिराचा मागील भाग हनुमान नगरचा काही भाग, पारोळा रोड, चोपडा रोड लगतचा भाग आदी नगरमध्ये बेघर लोकांची अनेक दिवसांपासून मागणी होती की, मालकी हक्काचा उतारा मिळावा.
यासाठी धरणगाव बेघर अतिक्रमण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. व्ही.एस. भोलाणे, सचिव रवींद्र कंखरे यांनी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नेहरूनगर भागातील राहणाऱ्या १८० बेघर लोकांना मालकी हक्काचे उतारे वाटण्याचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रथम दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. मालकी हक्काचे उताऱ्यांचे वाटप माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महेंद्र सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डी.जी.पाटील, दिलीप पाटील, धरणगाव बेघर अतिक्रमण संघर्ष समितीचे ॲड.व्ही.एस.भोलाणे, सचिव रवींद्र कंखरे, जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन, ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब वाघ, चंदन पाटील, विलास महाजन यांच्या हस्ते नेहरूनगरमधील रहिवाशी यांना स्वतःला हक्काचे मालकी हक्काचा उतारा देण्यात आला. १८० लोकांना मालकी हक्काचे सिटीसर्व्हेचे उतारे देण्यात आले.
सर्व बेघर लोकांना अतिक्रमण नियमित करून देण्यात येणार
यावेळी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, शासनाच्या नियमाप्रमाणे नेहरूनगरमधील बेघर लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे अतिक्रमण नियमित करून देण्यात येत आहे. तसेच धरणगाव शहरातील उर्वरित अतिक्रमण भागात राहणाऱ्या सर्व बेघर लोकांना अतिक्रमण नियमित करून देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी मालकी हक्काचे उतारे वाटप करत असताना रहिवासी व्यासपीठाच्या समोर नाचत होते. यावेळी डी.जी.पाटील, दिलीप पाटील, संजय महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन वाय.जी.पाटील तर बेघर अतिक्रमण संघर्ष समितीचे सचिव रवींद्र कंखरे यांनी आभार मानले.