जळगाव जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर क्षेत्रात १४ टक्के पेरण्या

0
102

साईमत, शरद भालेराव, जळगाव :

अर्धा जून महिना उलटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र सात लाख ४९ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी ११ जून अखेरपर्यंत एक लाख चार हजार हेक्टर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवळ ४० टक्के पेरण्या केल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी दमदार पावसाची गरज आहे. तेव्हाच उर्वरित महत्त्वाच्या पेरण्यांना वेग येणार असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. खान्देशचे नगदी पीक ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची पाच लाख ५८ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक लागवड झाली आहे. त्याखालोखाल इतर पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, इतर गळीतधान्य आदी प्रमुख पिके घेतली जातात.

जिल्ह्यात कपाशी खालोखाल मका ९८ हजार हेक्टर, ज्वारी १९ हजार २०० हेक्टर, सोयाबीन १८ हजार ९४१ हेक्टर, उडीद १४ हजार हेक्टर, मूग १४ हजार ५०० हेक्टर, तूर ११ हजार ५६० हेक्टर, बाजरी १० हजार हेक्टर लागवडीचा समावेश आहे. त्यापैकी कपाशी, मका, तूर, उडीद यांची ११ जूनपर्यंत एक लाख चार हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. अद्यापही जनतेची उकाड्यापासून सुटका झालेली नाही. त्यामुळे बळीराजाची पेरण्यांमुळे सुटका झालेली नाही. दमदार पाऊस झाल्यावरच पेरण्यांच्या कामांना वेग येणार आहे.

अमळनेर तालुक्यात खरीपाची कामे सुरु आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रापूर्वीच काही हेक्टरवर पेरणी केली आहे. ६८ हजार १४२ हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. जामनेर तालुक्याचे खरीपाचे एकूण क्षेत्र साधारण ९९ हजार ४३० हेक्टर आहे. यंदाही ९९ हजार हेक्टरपर्यंत लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्‍चित केले आहे. शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रवृत्त करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

चाळीसगाव तालुक्यात कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात ६७ हजार हेक्टरवर बीटी कपाशी लागवडीची तयारी केली आहे. ८६ हजार १५३ हेक्टर खरीप लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र ठरविले आहे. त्यात कापूस मुख्य पीक राहील. शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीवरच अधिक भर राहिल्याने कृषी विभागाने यंदा बियाण्यांची तीन लाख १६ हजार पाकिटांची मागणी केली आहे. यंदा बागायती कपाशी दोन हजार ७०७ हेक्टर व मका ११९ हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस झाल्याने तीन दिवसात ३० टक्के कपाशीसह मक्याची लागवड होईल. आतापर्यंत बहुतांश भागात लागवड झाली आहे.

धरणगाव तालुक्यात यंदा खरीपाची ४५ हजार ५६३ हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. आतापर्यंत केवळ ८९२ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. यंदा रणरणत्या उन्हामुळे मे मध्ये कापसाची लागवड कमी झाली आहे. यावल तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ९५ हजार ४३५ हेक्टर आहे. खरीप लागवडीलायक एक क्षेत्र ४४ हजार ५१० हेक्टर आहे. यंदा तालुका कृषी विभागास खरीप हंगामात ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात कापूस लागवड २५ हजार ४०३ हेक्टर, सोयाबीन तीन हजार २०० हेक्टर, मका तीन हजार ९६० हेक्टर क्षेत्रावर आणि त्या खालोखाल ज्वारीचे उद्दिष्ट प्रस्तावित आहे.

बियाणे घेण्यासाठी आर्थिक ओढाताण

खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे. त्यामुळे कापसाच्या निर्धारित किमतीपेक्षा जास्त पैसा मोजावा लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दमदार पावसाची गरज आहे.

-पंढरीनाथ पाटील, शेतकरी, शेरी, ता.जामनेर

शेतकऱ्यांनी जैविक बीज प्रक्रिया करावी

पावसाची ७५ ते १०० एम.एम. नोंद झाल्यास शेतकऱ्यांना पेरण्यांच्या कामांसाठी योग्य असते. त्यामुळे जमीनीत ओलावा निर्माण होतो. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने पेरण्यांच्या कामांना वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे त्यांची उगवण क्षमता वाढून रासायनिक खतांची बचत होते.

-कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here