शहराच्या विविध विकास कामांसाठी १२२ कोटींचा निधी : आ. किशोरआप्पा पाटील

0
36

विरोधकांच्या टीकेला विकासकामातून दिले उत्तर

साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

शहरातील पाणीपुरवठा, भुयारी गटार आणि रस्त्यांच्या विकास कामासंदर्भात काही दिवसांपासून विरोधकांकडून टिका सुरू आहे. अशा टिकेला मी विकासाने उत्तर देत आहे. आगामी किमान २५ वर्षापर्यंत शहरातील मुलभुत सुविधांवर विरोधकांना बोलायची संधीच मिळणार नाही. मुलभुत गरजांवर २२२ कोटी रूपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, एम.एस.पी.बिल्डकाॅनचे संचालक मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, पदमसिंग पाटील, गंगाराम पाटील, प्रवक्ते प्रदीप देसले, शरद पाटे, बंडु चौधरी, मुख्याधिकारी मंगेश देवरे, लखीचंद पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, शहराची दिवसेंदिवस चारही बाजूने वाढ होत असल्याने वाढीव वस्तीला पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. भुयारी गटारीचे काम पूर्ण न झाल्यामुळे रहदारीच्या काही रस्त्यांची अवस्था खराब होती.पण आता अशा सर्व समस्या दूर होणार आहे. ६० कोटी रूपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. या योजनेअंतर्गत फिल्टेशन प्लॅंट, गिरणा पंपिंगवरून मोठी पाईपलाईनचे काम केले जाणर आहे. शहराचा वाढीव विस्तार पाहता ५८ कोटी रूपये भुयारी गटारींच्या कामांसाठी मंजूर केले आहे .शहरातील वाढीव वस्तींचे आणि काही मुख्य चौक सुशोभीकरण काम यात पूर्ण होणार आहे. भुयारी गटारीचे काम करत असतांना शहरातील अनेक काॅलन्यांमधील रस्ते खराब होत असल्याने रेल्वे लाईनच्या भडगाव रस्त्याकडील भागातील रस्त्यांना १०४ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. रस्त्यांचीही समस्या आता सुटणार आहे. अशा विकास कामांमुळे आगामी २५ वर्षात पाणीपुरवठा, रस्ते व भुमिगत गटारींच्या समस्या उद्भवणार नाहीत, असेही आ.पाटील यांनी सांगितले.

शहरवासीयांना लवकरच राम मंदिराच्या दर्शनाचा लाभ

गेल्या काळात शहरातील सर्वच खुल्या भुखंडांचा विकास करण्याचे काम हाती घेतले होते. त्या कामात मोठ्या भुखंडांना निधी अपूर्ण पडल्याने कामे अपूर्ण होती. यासाठी १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सर्व खुल्या भुखंडाची कामे पूर्ण होतील. शहरातील राम मंदिराला जाण्यासाठी जैन पाठशाळेच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्यावर अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गावरून लवकरच शहरवासीयांना राम मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेता येईल, अशीही माहिती आ.पाटील यांनी दिली.

विकास कामांमध्ये एम.एस.पी.बिल्डकाॅनचे योगदान

शहर विकासाच्या कामांमध्ये एम.एस.पी.बिल्डकाॅनचे योगदान मोठ्या प्रमाणात राहणार आहे. विकास कामात आजपर्यंत त्यांनी दिलेल्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आल्याचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here