साईमत, सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र या रस्त्यावर संगमनेर नाका ते बस स्थानक दरम्यान पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून डांबर फवारण्यात आले होते. बुधवारी कडकडीत उन्हामुळे हे डांबर वितळून रस्ता निसरडा झाला व अनेक दुचाकी स्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या.
सिन्नर शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. साडेआठ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाची गुणवत्ता खराब असल्याचे नागरिकांच्या तक्रारीतून वारंवार सांगण्यात आले. मात्र या दुरुस्ती कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महिनाभरापासून संपूर्ण तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. असे असताना पावसात काम केल्यामुळे काही ठिकाणी कामाची गुणवत्ता ढासळली असेल अशी पाठराखण अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.बस स्थानक ते संगमनेर नाका दरम्यान दुरुस्ती कामानंतर देखील स्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडले ते खड्डे बुजवण्यासाठी व गेल्या कामाची गुणवत्ता झाकण्यासाठी ठेकेदाराने डांबर फवारून रस्ता अधिक गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठेकेदाराची ही बनव्ोगिरी आणि धूळफेक बुधवारी पडलेल्या रखरखीत उन्हामुळे चव्हाट्यावर आली. उन्हामुळे डांबर वितळून अक्षरशः चिखल तयार झाला.त्यामुळे निसरड्या झालेल्या या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अनेक दुचाकी स्वार घसरले. चार चाकी वाहने देखील स्लिप होऊ लागली.
अतिशय हळुवारपणे मार्गक्रमण करत वाहनांची ये जा दुपारी चार वाजेपर्यंत सुरूच होती.रस्त्याच्या दुरुस्ती कामाव्ोळी ठेकेदाराने गुणवत्तेचे निकष पाळले नाही. त्यामुळे लवकरच रस्त्यात खड्डे पडले. त्यात डांबर फवारणी करण्यात आल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.या संपूर्ण दुरुस्ती कामाची चौकशी करावी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्ती कामावर देखरेख होती. वाहतुकीची वर्दळ आणि गॅस लाईनच्या कामामुळे दुरुस्ती कामात अडथळे आले होते.बसस्थानक ते संगमनेर नाका दरम्यान विरघळलेल्या डांबरावर कच पसरवण्यात येईल त्यामुळे हे काम अधिक भक्कम होईल अशी मोहिती संबंधितांकडून देण्यात आली.