साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी
येथील नगर पालिका प्रशासनाने मुलभूत सुविधाबाबत चालविलेल्या अक्षम्य दिरगाईचा “समतेचे निळे वादळ” या सामाजिक संघटनेच्या वतीने भरदिवसा दिवा दाखवून लक्ष वेधण्यात आले आहे.
पाणीपुरवठा,साफसफाई,दिवाबत्ती आदी मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगर पालिकेची असतांना या महत्त्वपूर्ण विषयाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.
मलकापूर शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजना,न.प.फंड व अन्नाभाऊ नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रेल्वे स्थानका जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ,तहसिल चौक,हनुमान चौक,गाडगे बाबांच्या पुतळ्याजवळ,बस स्थानकाजवळ,शहीद संजयसिंह राजपूत यांचे स्मारकाजवळ,गांधी चौक व पिलूतकीया आदी ठिकाणी हायमास्ट लँप मंजूर केले.शिवाजीनगर स्थित छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नगर पालिका फंडातून तर शहीद अब्दूल हमिद चौक भिमनगर-रामदेवबाबा नगर प्रवेश द्वारावर अन्नाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत मंजूर करून कंत्राटदारास कार्यारंभ नोटीस दिली असली तरीही कंत्राटदाराने ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत काम पूर्ण केलेले नाही व न.प.प्रशासनाने याकडे फारसे गांभिर्याने लक्ष दिले नाही.
गांधी चौकातील विजयस्तंभाजवळ सुमारे तिन महिन्यापासून गिट्टीचा ढिग पडून आहे.साधे फाऊंडेशन देखील तयार केलेले नाही.तहसिल चौकात केवळ फाऊंडेशन अनेक महिन्यापासून तयार असले तरी हायमास्ट लँप उभारण्यात आलेला नाही.हनुमान चौक,गाडगे महाराज पुतळ्याजवळ,बस स्थानकाजवळ साधे फाऊंडेशन देखील कंत्राटदाराने तयार केलेले दिसून येत नाही.याबाबतीत नगर पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पंधरा दिवसाचे आत कार्यारंभ आदेशानुसार हायमास्ट दिवे उभारणी करून सुरू करण्यात यावे.अन्यथा आमच्या संघटनेस मलकापूर शहरातील जनतेच्या हितासाठी तिव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा “समतेचे निळे वादळ” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांनी न.प.ला दिला आहे.
यावेळी झालेल्या प्रातिनिधीक दिवा दाखवा आंदोलनात सर्वश्री दिलीप भाऊ इ़गळे, दिपक मेश्राम, रवि भारसाकळे , अशोक जाधव,राजु जाधव, श्यामराव ठाकरे, राहुल वाकोडे, विजयकांत मोरे, शेख इमरान, राजेश रायपुरे, गणेश कळासे, दिपक रणित,निलेश उमाळे, कुणाल इंगळे, अजय वि इंगळे आदी प्रामुख्याने सामिल झाले होते.