जळगाव ः प्रतिनिधी
भाजपात राहिलात तर तुमच्या प्रभागात कामे होणार नाहीत, अशी धमकी नगरसेवकांना दिली जाते आहे. सत्तेच्या बळावर पैशांचेही आमिष दाखवले जाते आहे. मात्र, कोणतेही सत्ताधारी निधी खर्चाच्या बाबतीत अशा पक्षीय दुजाभाव करू शकत नाहीत, असा दावा भाजपचे नगरसेवक आणि माजी महापौर भारती सोनवणे यांचे पती कैलासअप्पा सोनवणे यांनी केला आहे.
भाजपचे तीन नगरसेवक शनिवारी शिवसेनेला जाऊन मिळाले. आणखी काही नगरसेवक भाजप सोडून जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात कैलास सोनवणे यांच्या नावाचाही उल्लेख काही जणांकडून केला जातो आहे. त्या अनुशंगाने त्यांना विचारले तेव्हा त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
गेल्या दोन महिन्यात पालकमंत्र्यांशी आपली भेटही झालेली नाही आणि फोनवरही बोलणे झालेले नाही. काही लोकांनी रचलेले हे बदनामीचे षड्यंत्र आहे. ज्येष्ठ नगरसेवकांची नावे सांगून इतरांना फोडण्याचा हा प्रयत्न असावा. आपण भाजप आणि गिरीश महाजन यांना सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. महापौर निवडीच्या वेळी बंडखोरी केलेल्या २७ नगरसेवकांत तत्कालिन उपमहापौरांसह सभापती पद भोगलेल्यांचा देखील समावेश होता. पक्षाने मोठी पदे दिली, प्रभागांमध्ये विकास कामेही झाली. असे असतानाही पक्ष सोडणारे आर्थिक मोहोला बळी पडले आहेत, असेही श्री. सोनवणे म्हणाले.