जळगाव : प्रतिनिधी
सध्या राज्यात भोंगे विरुध्द हनुमान चालीसा असे वातावरण तापले असल्याने पोलीस अधिकाऱ्यांना सतर्कतेसाठी सुट्या नाकारण्यात आल्या आहेत.अशात पोलीस अधिकाऱ्यांच्या सुकन्येने आय.ए.एस. क्लासेसचा शोध घेत त्यात प्रवेश घेवून वडिलांना कुठलाही त्रास होवू नये याची काळजी घेत एकप्रकारे वडिलांच्या कर्तव्यात सहभाग घेतला आहे. दरम्यान, श्रुती शिंदे ही काल रात्री राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाली. त्यावेळी वेळात वेळ काढून वडील पो.नि. विजय शिंदे यांनी जळगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचून श्रुतीला शुभेच्छा दिल्या.
राज्यात राजकीय वातावरण तापले असल्याने पोलीस खात्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सुट्या शासनाने रद्द केल्या आहेत. त्यातल्या त्यात अधिकाऱ्यांना तर अजिबात सुटी नाही व कर्तव्यावर सतर्कतेसाठी सतत अलर्ट राहावे लागते. शहरातील रामानंद पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची सुकन्या श्रुतीचे आय.ए.एस.अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. हे स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचा तिने चंग बांधला आहे.त्यासाठी वडिलांच्या अतिव्यस्त कामातून वेळ न मिळाल्याने तिने तिचे स्वप्न साकार होण्यासाठी स्वत:च आयएएसच्या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी असणाऱ्या क्लासेसचा शोध घेतला तसेच या क्लासेसमध्ये तिने स्वत:च ॲडमिशन घेतले. या स्पर्धा क्लासेस दिल्ली येथे आहे. श्रुतीची आई गृहीणी असून त्या नाशिक येथे वास्तव्याला आहे. वडिल जळगाव येथे व श्रुती आईजवळ नाशिक येथे. असे असतांनाही श्रुतीने न डगमगता आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व वडिलांना त्यांच्या व्यस्त कामात व्यत्यय न आणता क्लासेसचा शोध घेतला व काल ती दिल्लीकडे राजधानी एक्सप्रेसने रवाना झाली.यावेळी जळगाव रेल्वे स्थानकावर आली असतांना तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी वडील पो.नि. विजय शिंदे यांच्यासह ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे, साईमत मीडिया प्रा.लि.चे संचालक परेश बऱ्हाटे, सतिश मोरे, कैलास विसावे आदींनी रेल्वे स्थानकावर पोहचत शुभेच्छा दिल्या.