महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात ः महावितरणचे यशस्वी नियोजन

0
36

जळगाव : प्रतिनिधी
कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, यांसारख्या राज्यात 9 ते 15 टक्क्यांपर्यत वीजेची तुट असतांना महावितरणने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे राज्यात ही तूट शुन्य टक्क्‌यापर्यंत म्हणजेच मागणी एवढा वीजपुरवठा करण्यात आला. त्यामुळे राज्यातील भारनियमन आटोक्यात आले असून महावितरणचे प्रभावी नियोजन यशस्वी होतांना दिसत आहे. परिणामत: मागील चार दिवसांत राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून वाढत्या तापमानात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

देशातील 10 प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने इतर राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन केल्या जात आहे. राज्यातील जनतेला भारनियमनातून दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने बैठका घेऊन आवश्‍यक उपाययोजना वेगाने व ताबडतोब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री ना.श्री. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री.दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे प्रभावी नियोजन केल्यानेच राज्यात विजेच्या उपलब्धतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मागील आठवड्याभरात अदानी पॉवरने आपली उपलब्धता 1700 मेगावॅटवरुन 3011 मेगावॅट, महानिर्मितीने 6800 मेगावॅट वरुन 7500 मेगावॅट याशिवाय एनटीपीसीने 4800 मेगावॅटवरून 5200 मेगावॅट पर्यंत विजेची उपलब्धता वाढविलेली आहे, याशिवाय महावितरणच्या सततच्या पाठपुराव्यामुळे साई वर्धा प्रकल्पातील वीज उत्पादन 140 मेगावॅटवरुन 240 मेगावॅटपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. सोबतच सीजीपीएलकडून करारीत 760 मेगावॅटपैकी उर्वरित 130 मेगावॅट वीज पुरवठा 24 एप्रिलपासून सुरु झालेला आहे. तर एनटीपीसीच्या मौदा वीजनिर्मिती प्रकल्पातील बंद असलेला संच 25 एप्रिलपासून कार्यान्वित झाला आहे, त्यामधून 250 मेगावॅट इतका वीजपुरवठा सुरु झाला आहे. या सर्व नियोजनासोबतच, कोयना
जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करून व गरजेनुसार पावर एक्सचेंजमधून उपलब्ध असलेल्या दराने वीजखरेदी करून महावितरणद्वारे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे व यामुळे आज राज्यात कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही.

सोमवारी सकाळी महावितरणची विजेची मागणी 23 हजार 850 मेगावॅट होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून 7379 मेगावॅट, केंद्राकडून 5730 मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पामधून 218 मेगावॅट, अदानीकडून 3011 मेगावॅट, आरपीएलकडून 1200 मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून 40 मेगावॅट, साई वर्धाकडून 240 मेगावॅट सोबतच बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून 1187 मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून 1314 मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून 239 मेगावॅट, सहवीज निर्मिती प्रकल्पांतून 977 मेगावॅट, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून 224 मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर अखंडित वीजपुरवठा केला आहे तसेच कृषिपंपाना वेळापत्रकानुसार सुरळीत वीजपुरवठा करण्यात येत आहे. विजेची पुरेशी उपलब्धता व भार व्यवस्थापनाद्वारे कोणत्याही परिस्थितीत विजेचे भारनियमन करावे लागणार नाही यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here