जळगाव ः प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहयोगी अश्विन झाला व त्यांच्या पत्नी निर्मला झाला या दांपत्याने गुजरात विद्यापीठातून गुजराथी व हिंदी भाषेत गांधीजींच्या जीवनावर पीएच.डी केली आहे. त्यांचे दोन्ही संशोधन प्रबंध गुजराथी, हिंदी, इंग्रजी भाषेत मुद्रित (पुस्तक प्रकाशन) करण्याचे निश्चित असून मराठीतही भाषांतरीत केले जाणार आहे. या दोघं अभ्यासकांनी आपले संशोधनपर प्रबंध भवरलाल जैन यांना अर्पण केले आहेत. झाला दांपत्याचे संशोधन गुजरात विद्यापीठात ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भंवरलाल जैन यांची प्रेरणा फंड रेझिंग विषयासंदर्भातील प्रथम संशोधन
गांधीजींच्या फंड रेझिंग या विषयासंदर्भातील हे प्रथम संशोधन आहे. भवरलाल जैन यांनी झाला दांपत्याला गांधी रिसर्च फाऊंडेशन रेसिंडेट स्कॉलरसाठी संशोधन करावे अशी प्रेरणा दिली होती. गांधीतीर्थामधील वाचनालयातून झाला दांपत्यास संशोधनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
अश्विन झाला यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीही त्याच कालवधित भवरलालजींच्या प्रेरणेने शंभर विषय निवडले. त्यातून ‘महाराष्ट्रातील गांधीजीः कालगणना, प्रसंग आणि कृती’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. गुजराथ विद्यापीठात त्यांचे प्रबंध ऑनलाईन सादर झाले. सद्यपरिस्थितीत त्यांचा व्हायवाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.
१२ हजार पुस्तकांची मदत
झाला दांपत्याने हे संशोधन करताना गांधी रिसर्च फाउंडेशन येथे असलेल्या पाच लाख डॉक्युमेंटचा वापर केला. यासोबत १२ हजार पुस्तकांच्या मदतीने त्यांनी हे आगळे वेगळे व महत्वपूर्ण असे संशोधन केले आहे. गांधी रिसर्चसह त्यांनी गुजरात विद्यापीठ, पुणे ग्रंथालय व साबरमती येथील पुस्तकांची मदत घेतली
११ वर्षांपूर्वी आले जळगावात
मूळ वेरावल (सोमनाथ) येथील रहिवासी झाला दांपत्य अकरा वर्षांपूर्वी जळगावात नोकरीनिमित्त आले. प्राध्यापक असलेले झाला यांचा गांधीजींचे जीवनकार्य हा विषय असल्याने ते गांधी रिसर्च येथे रुजू झाले. ‘गांधीजींच्या सार्वजनिक कामांसाठी आर्थिक साधने संकलनः प्रयत्न, पद्धती आणि व्यवस्थापन’ या विषयात अश्विन झाला यांनी संशोधन केले. झाला दाम्पत्य गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये सहकारी या नात्याने सन २०१० पासून कार्यरत आहे. फाऊंडेशनच्या व्यवस्थापन सदस्यांनी या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे. या दाम्पत्यास गुजराथ विद्यापीठाचे डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे मार्गदर्शन लाभले.