फैजपूर : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील बामणोद येथे शेतकऱ्यांच्या शेतातून कापून ठेवलेला कोरडा हरभरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. यासंदर्भात फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर असे की, यावल तालुक्यातील बामणोद येथील शेतकरी राजेंद्र गोपाळ राणे (वय-६०) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या उदरनिर्वाह करतात, त्यांचे आमोदा ते बामणोद रोडवर शेत गट नंबर १८० मध्ये त्यांचे शेत आहे. त्यांनी शेतात हरभरा पिकाची पेरणी केली होती. सध्या हरभरा कापणीवर आल्यानंतर त्यांनी हरभरा शेतात कापून ठेवला होता. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३ क्विंटल वजनाचा कापून केलेला कोरडा हरभरा चोरून नेला आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतात गेल्यावर राजेंद्र राणे यांना हरभरा चोरून नेल्याचे दिसून आले. राजेंद्र राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किरण चाटे करीत आहे.