जळगाव ः प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यानिमित्ताने मंंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात काल हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष्य अवघड नाही.भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योजना केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या आहे तसेच यापुढेही अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात असे आवाहन केले. यावेळी आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
तापी संदर्भात मध्य प्रदेशशी समन्वय राखण्याच्या सूचना
मध्य प्रदेशातून येणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना अचानक रात्रीतून धोका निर्माण होतो. याबाबत मध्य प्रदेश सोबत समन्वय राखण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्सून पूर्व आढाव्यात दिल्या.
पाणी योजनेमुळे शेजारचे गाव टँकरमुक्त : पाटील
राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत जनावरांसाठी देखील पिण्याच्या पाण्याचा विचार व्हावा ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे जनावरांची तहान भागवणे शक्य झाले. योजनेतून पाथरी पाणी टंचाईपासून मुक्त केले.शिल्लक पाण्यातून शेजारचे जवखेडे हे गाव टँकरमुक्त केल्याची माहिती पाथरीचे सरपंच शिरीष पाटील यांनी कार्यक्रमात दिली.