जळगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील भोकर आणि पिंप्राळा महसूल मंडळातील 21 गावांना 9 आणि 10 जून रोजी आलेल्या वादळी वारे व पावसाने दिलेल्या फटक्यामुळे सुमारे 2091 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात बहुतांश केळीचे क्षेत्र आहे. या नुकसानीची आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अनेक शेतकर्यांना आपल्या व्यथा-वेदना सांगतांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली.
अलीकडच्या काही वर्षांमधील सातत्याने होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात तरी शेतीच्या व्यवस्थापनाचा पॅटर्न बदलण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील भोकरसह परिसरातील गावांना 9 आणि 10 जून रोजी वादळी वारे आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यात अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले. राज्यसभा निवडणुकीनिमित्त ना. गुलाबराव पाटील हे मुंबई येथे असल्याने त्यांचे पुत्र जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी लागलीच शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. यानंतर काल पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी गाढोदा, भादली खुर्द,भोकर, पळसोद शिवार, कठोरा, करंज, घार्डी, नांद्रा बुद्रुक नंदगाव आदींसह परिसरातील शिवारात थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
याप्रसंगी त्यांच्या सोबत प्रांताधिकारी सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत,मंडळ कृषी अधिकारी एम.जी.जंगले, कृषी सहायिका अनिता जाधव, वीज व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.