साईमत , जळगाव, प्रतिनिधी
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य व नाट्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे. यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार जळगाव येथील ख्यातनाम लेखक व रंगकर्मी शंभू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे . निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर उपस्थित होते.
शंभू पाटील यांच्या सोबत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत निशिकांत ठकार यांना तर शैलजा बापट, तमाशा कलावंत वसंत अवसरीकर, विश्वास वसेकर, यांनाही सन्मानीत करण्यात येणार आहे. नाट्यसेवा पुरस्कार जाहीर झालेले जळगाव येथील शंभू पाटील यांनी मराठी नाट्य परंपरा जिवंत राहण्यास मदत केली आहे . एल्गार, हा वेडा माणूस शोधतोय, अभिशाप, धर्मसत्य, अपूर्णांक व सध्या गाजत असलेले अमृता, साहिर, इमरोज व नली इत्यादी नाटकांचे लेखनही त्यांनी केले आहे . महाराष्ट्रात व बाहेरील राज्यात अनेक ठिकाणी परिवर्तन कला महोत्सवांच्या निमित्ताने मराठी नाटक समृद्ध केले. परिवर्तन ही संस्था गावोगाव नाटकांचे, सांगीतिक कार्यक्रमातून नाट्यकला जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमधे सक्रीय योगदानाचा गौरव म्हणून 25 हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह देवून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे हे 33 वे वर्ष असून 30 ऑगस्ट 2023 रोजी पद्मश्री विखे पाटलांच्या जयंतीदिनी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांगितले.खान्देशातील रंगभूमीला पहिल्यादा हा पुरस्कार मिळाला आहे . खान्देशातील रंगकर्मीचा हा सन्मान म्हणजे खान्देशचा गौरव आहे. अशी भावना साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी व्यक्त केली .