साईमत, धुळे : प्रतिनिधी
धुळे ते दादर एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन दिवसांऐवजी रोज धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून लवकरच परिपत्रक निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. यासह धुळे ते चाळीसगाव या पॅसेंजरच्या चार फेऱ्या दररोज होत असून रात्रीची एक फेरी वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दसरा मैदानजवळील रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना खा. डॉ. भामरे यांनी मतदारांना दिलेली सर्व आश्वासने आपण पाळणार असल्याची ग्वाही त्यांनी यानिमित्त दिली. गाडी क्रमांक ०१०६५ डाऊन दादर-धुळे एक्स्प्रेस ही दादरहून रविवार, सोमवार आणि शुक्रवार सायंकाळी ४:१५ वाजता सुटते. धुळे स्थानकावर रात्री ११:३५ वाजता पोहोचते, तर गाडी क्रमांक ०१०६६ अप धुळे-दादर एक्स्प्रेस ही गाडी धुळे येथून सोमवार, मंगळवार व शनिवारी सकाळी ६:३० वाजता सुटते, तर दादर येथे दुपारी १:१५ वाजता पोहोचते. व्यापारी, नागरिकांना मुंबईत व्यापारानिमित्त तसेच मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी सोईची ठरते. ही एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावत होती व तिला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ती दैनंदिन सुरू होणार आहे. दरम्यान, धुळे ते दादर एक्स्प्रेस आता रोज धावणार म्हटल्यावर धुळेकरांना कामकाज व व्यवसायानिमित्त रोज राज्याची तथा देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गाठता येणे शक्य होणार आहे.