जळगाव ः प्रतिनिधी
पाणी हेच जीवन आहे या वाक्यावरून पाण्याचे महत्व लक्षात येते.पाण्याच्या उपलब्धतेवर समस्त सजीव सृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे.पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. याअनुषंगाने राज्यभर जलजागृती सप्ताहाचा आज आरंभ करण्यात आला. येथील आकाशवाणी चौकीतील पाटबंधारे विभागातील मुख्य कार्यालयात कार्यकारी संचालक पी.जी.मांडाळे यांच्या हस्ते जलसप्ताह प्रारंभ करण्यात आला. या जलसप्ताहाची सांगता 22 मार्च रोजी होणार आहे.
तापी पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयात जलजागृती सप्ताह सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मुख्य अभियंता जी.डी.बोरकर, अधिक्षक अभियंता श्री.दळवी, जे.आय.पी.सी.चे अधिक्षक अभियंता श्री.भोसले, जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बेहरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अग्रवाल, वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे आदींसह सर्व पाटबंधारे विभागातील अभियंत्यांची विशेष उपस्थिती होती.
सप्ताहाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी तापी खोरे विभागातील असलेल्या सर्व नद्यांचे पाणी महाकुंभात एकत्र करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचा योग्य वापर करा, पाण्याचा वापर काटकसरीने धोरण अवंलबन करा, आज मितीस शेती, औद्योगिक क्षेत्र आदींसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. यासाठी योग्य नियोजन करून पाण्याचा वापर करण्यात यावा. असे सांगत सध्या पाण्याचे स्त्रोत कमी होत असून पाणी जपून वापरा,असे आवाहन या जलसप्ताहानिमित्त करण्यात आले.
यावेळी तापी पाटबंधारे विभागातील विविध विभागप्रमुखांसह कर्मचारीवृंदाचा सहभाग होता. या सप्ताहाची सांगता 22 मार्च रोजी होणार आहे. या सप्ताहात अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व विविध विभागातील अभियंत्यांची शेती व कार्यक्षेत्रावर होणारे परिणाम याबाबत कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.