जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा बँकेचे मध्यस्थ म्हणून शेतकऱ्यांना कर्जवाटप करणाऱ्या तब्बल 159 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रम केला आहे. या सोसायट्यांनी तब्बल 100 टक्के कर्जाची वसुली केली आहे. वसुलीच्या माध्यमातून जिल्हा बँकेची वार्षिक पीककर्ज वसुली तब्बल 650 कोटींवर पोहोचली.
शासनाच्या नव्या धोरणानुसार बँकेकडून शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या मर्यादेत विनाव्याजी कर्ज दिले जाते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने 6 महिन्यांपासून बँकेकडून कर्जवसुलीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, 31 मार्चपूर्वी 650 कोटी रुपयांची कर्ज वसुली झाली आहे. जिल्हा बँकेची पीककर्जाची थकबाकी वाढल्याने बँकेचा एनपीए वाढला आहे. दरम्यान, कर्जवसुलीसाठी बँकेने राबवलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना बँकेने एकरकमी परतफेड करण्याची संधी दिली होती. या योजनेत 20 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेत बँकेची 200 कोटी रुपये कर्जफेड केली आहे. तर दुसरीकडे 3 लाखापर्यंत विनाव्याजी या योजनेत शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी मुद्दल कर्ज रक्कम भरून कर्जफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या 1 लाखावर आहे. बँकेच्या कर्जवसुलीला मिळालेल्या यशामुळे बँकेकडून नवीन आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना पीककर्जाची मर्याद वाढवून दिली जाऊ शकते.
सोसायट्यांना जीवदान
थकीत कर्जामुळे विकासोंचे अस्तित्व धोक्यात आले होते. अनेक सोसायट्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या.यंदा जिल्ह्यातील 159 सोसायट्यांनी 100 टक्के कर्जवसुली करून नव्याने बँकेचा आणि शेतकऱ्यांचाही विश्वास संपादन केला आहे.