जळगावातील भाजप खासदारांसह आमदारांचे रात्री ९ वाजता ठिय्या आंदोलन

0
14

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ द्या, असं म्हणत भाजप खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव घातला व जाब विचारला.
जिल्ह्यातील १० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून त्यांची ४ ते ५ कोटी रुपयांची पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. मागील २४ महिन्यांपासून पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याचं सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला. शुक्रवारी रात्री चक्क ९ ते १० वाजेदरम्यान उन्मेश पाटील, सुरेश भोळे, पंचायत समिती सदस्य हर्षल पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. तसंच पीकविम्याची रक्कम देण्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला.
यादरम्यान खासदार उन्मेष पाटील यांनी कृषीमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानंतर एक महिन्यात जिल्ह्यातील सर्व वंचित शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी पाटील यांनी दिले आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here