फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे बंद असलेली अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेले येथील खंडोबा देवस्थानची यात्रा कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून उद्यापासून सुरू होत आहे. दिनांक १७ मार्च ते २४ मार्च दरम्यान ही यात्रा भरणार असून यात्रा विश्वासाठी पोलीस प्रशासन, नगरपालिका, वीज वितरण कंपनी, मंदिर देवस्थान व अन्य घटक सज्ज असल्याचे देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या यात्रोत्सवात भाविकांनी खंडोबा देवाला मानलेला मान, कर्ण छेदणाचे कार्यक्रम शहरात मोठ्या प्रमाणात होणार आहे. यासह वेगवेगळी खेळणी, आकाश पाळणे, ब्रेक डान्स, मौत का कुवा, भांड्याची दुकाने, हॉटेल आधी दुकाने थाटण्यात आलेली आहे. यात्रा उत्सवा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर सर्वांवर राहणार आहे. कोरोना नियमाचे पालन, मास्कचा वापर करण्याचे आवाहन देवस्थानने केले आहे.
शांतता कमिटी सदस्य, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, वीज वितरण कंपनी तसेच राजकीय पदाधिकारी या यात्रा उत्सवा दरम्यान सहकार्य करणार आहे. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाचा लहान थोरांसह सर्व भाविकांनी शिस्तीने आनंद घ्यावा असे आवाहन देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर व समस्त कार्यकर्त्यांनी केले आहे.
फैजपूर खान्देशवासीयांचे आराध्य दैवत, प्रतीजेजुरीचे जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या, फैजपूर येथील खंडोबाचा यात्रेला गुरुवारपासून सुरूवात होत आहे. खंडोबा देवस्थानात असलेली अश्वारूढ मूर्ती, इंदूर येथील श्रीमंत महाराज धीरज होळकर सरकार यांनी देवस्थानाला दान स्वरुपात दिली आहे. ३०० वर्षांपूर्वी ही मूर्ती फैजपूरहुन तीन किलोमीटर न्हावी या गावी भाविक नेत असताना, बैलगाडी या जागेवरच अचानक थांबली. त्यानंतर भाविकांना खंडोबांनी दृष्टांत दिल्याने, त्याच जागेवर प्रतिष्ठापना केली , अशी अख्यायिका सांगितली जाते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेस या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने प्रत्येक वर्षी यात्रा भरवण्याची प्रथा पडली. यंदा १७ मार्चपासून पुढील आठ दिवस यात्रा भरणार आहे.