जळगाव ः प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षी घेण्यात आलेल्या 685 जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल काल जाहीर झाले असून यात दीपस्तंभ परिवारातील सदस्य असलेल्या हर्षल राजेश महाजन याने यूपीएससी परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे.
हर्षल महाजनने देशात 408 रँक प्राप्त केली आहे.हर्षलचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव असून त्याचा जन्म जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असून त्याचे पुढील शिक्षण मुंबई येथे झाले आहे.हर्षलचे दहावीपर्यंतचे शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे तर बारावीचे शिक्षण पेस ज्युनियर कॉलेज मुंबई येथे झाले आहे.त्यानंतर हर्षलने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून बी – टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे. हर्षलचे वडील राजेश महाजन पर्जन्य जलवाहिनी या विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले असून आई स्वाती महाजन या उद्योजिका आहे.
हर्षलला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील (आयएएस),दिग्विजय पाटील(आयएफएस), जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर आयकर आयुक्त विशाल मकवाना , दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन , जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी अनमोल मार्गदर्शन केले आहे. या यशाबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे, अप्पर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी हर्षलचे अभिनंदन केले आहे.