साईमत मलकापूर प्रतिनिधी
बनावट खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करुन त्याआधारे ‘एलटीसी’चा लाभ गटवर्ष २०१३-२०१६ या एकाच गटवर्षात दोन वेळा घेऊन शासनाची फसवणुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काही शिक्षकांनी एल.टी. सी गटवर्ष २०१३ – २०१६ या एकाच गटवर्षात दोन वेळा बनावटी व खोटी प्रतिज्ञापत्रे कागदपत्रे तयार करुन त्याआधारे शासनाची फसवणुक केली होती. तर शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपयांची लुट केली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जि.प. हायस्कूल धाड येथील तत्कालीन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशी अंती समोर आले होते. मात्र, शिक्षण विभागाकडून त्याच्यांविरुध्द कारवाई होत नसल्याने आरटीआय कार्यकर्ते प्रभाकर लक्ष्मण इंगळे (रा. बेलाड ता. मलकापुर ) यांनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.