आपत्ती व्यवस्थापनासाठी एनसीसी कॅडेट्सने एकजूट व्हावे- डॉ प्रशांत वाघमारे

0
12

साईमत फैजपूर प्रतिनिधी

मानवी जीवन असंख्य आपत्तींनी ग्रासलेले आहे. त्यात काही आपत्ती मानवनिर्मित असून काही निसर्गनिर्मित आहेत. अशा जीवित हानी आणि वित्त हानी पोहचविणाऱ्या आपत्तीच्या वेळी स्वतःचा, परिवाराचा व समाजातील इतर लोकांचा जीव वाचवण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सने ज्ञान व कौशल्य प्राप्त करून समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वासाठी सज्ज झाले पाहिजे असे आवाहन डॉ प्रशांत वाघमारे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार एन.डी.एम.ए. यांनी केले.

१८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी कर्नल पवनकुमार प्रशासकीय अधिकारी तथा कॅम्प कमाडंट, अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व नरवीरसिंग रावल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सुभेदार मेजर प्रेमसिंग, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, लेफ्टनंट दीपक पाटील, फर्स्ट ऑफिसर युवराज पाटील, सेकंड ऑफिसर नारायण वाघ, सिटीओ डॉ. दिपाली खडके, जे सी ओ, एन सी ओ व कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या परिसरात दिनांक 2 ऑगस्ट पासून एनसीसी चे वार्षिक प्रशिक्षण शिबिर संपन्न होत आहे. यात फिजिकल ट्रेनिंग, वेपन ट्रेनिंग, बॅटल फिल्ड, बॅटल क्राफ्ट, जजिंग डिस्टन्स, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणविकास, संभाषण कौशल्य विकास या महत्त्वपूर्ण विषयांसोबतच आपत्ती व्यवस्थापन या विषयावर तज्ञ व प्रशिक्षित मार्गदर्शकांकडून व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने डॉ. प्रशांत वाघमारे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपत्ती व्यवस्थापना संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. यात आपल्या आजूबाजूला वावरत असताना अनेक आपत्तींचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. अशा प्रसंगी शास्त्रोक्त ज्ञानाचा वापर करून आपण स्वतः सोबत अनेकांचा जीव वाचवू शकतो व समाजा प्रतीचे आपले उत्तरदायित्व पूर्ण करू शकतो असे मत व्यक्त केले.
यावेळी विविध आपत्तींच्या वेळी कशाप्रकारे जीवितहानी व वित्तहानी रोखली जाऊ शकते या संबंधी डॉ. प्रशांत वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यानंतर नरवीरसिंग रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनीही आपत्ती व्यवस्थापन आणि एन सी सी कडेटस याविषयी मौल्यवान मार्गदर्शन केले. एन सी सी ट्रेनिंग च्या माध्यमातून समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कॅडेट्सने सज्ज झाले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here