साईमत धुळे । प्रतिनिधी
येथील नंदिनी रवींद्र खैरनार(धोबी) वय 24, ह.मु. साईदर्शन कॉलनी, नकाणे रोड, देवपूर, धुळे हिने गुरुवारी (ता. 17) दुपारी बाराच्या सुमारास दभाशीजवळ तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिला उडी मारताना काही मासेमारी करणाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तिला बाहेर काढले. मात्र ती मृत झाली होती.
तिचे छायाचित्र व्हॉट्सॲपवर टाकण्यात आल्यानंतर पानसेमल (मध्य प्रदेश) येथील मामाने तिचे छायाचित्र पाहिले. तेव्हा नंदिनीबाबत उलगडा झाला. माहिती मिळताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.नंदिनीने नुकतीच सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळविली होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वडील रवींद्र सुकदेव खैरनार लॉन्ड्री व्यवसाय करतात. गरिबी असूनही मोठ्या मेहनतीने तिला सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. गेल्या महिन्यापासून ती नाशिकला प्रशिक्षण घेत होती. नुकतीच ती परत आली होती. मैत्रिणीकडे जाते, असे सांगून व मोबाईल घरी टाकून ती सकाळी बाहेर गेली. ती कुठे गेली म्हणून घरात विचारपूस सुरू असतानाच तिच्या मृत्यूचा निरोप आला. ती प्रेम खैरनार यांची बहीण आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे.