स्थानिक नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

0
3

जळगाव : विशेष प्रतिनिधी
शहर आणि शिवाजी नगर ला जोडणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून ते पूर्णत्वास केव्हा येईल हा प्रश्न आहे.मात्र पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे आणि आता त्यात पुलाच्या नेमक्या आकारावरून वाद सुरू झाला आहे , स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि समाजसेवक यांच्या त्रिकोणात हा वाद पेटला आहे. परिणामी पुलाचे काम पुढे रेंगाळणार आहेच .त्याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे.एकतर पूल तोडण्या आधी कोणतीच पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही . तरीही लोकांनी सारे सहन केले.आता पुलाच्या आकारावरून पुन्हा वाद सुरू झाल्याने स्थानिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. पुढे काम थांबले, रेंगाळले ,तर लोकांची सहनशीलता संपेल व त्याचा स्फोट होणे अगदीच निश्चित आहे. तेव्हा सामंजस्याने त्यावर तोडगा काढला जावा असे जनतेचे मत आहे.
शंभरावर आयुर्मान झाल्याने शहरातील शिवाजी नगर रेल्वेचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.व तो पडून नवीन पूल बांधण्याचे ठरले .सर्वप्रथम नवीन पूल कसा असावा यावर मंथन झाले .इकडे मामुराबद रस्त्यावरील रेल्वे मार्गखालून जाणार्या रस्त्यावर रेल्वेने गर्डर टाकून पुलाखालून अवजड वाहतूक बंद केली असल्याने शिवाजीनगर पुलावरूनच पुढे मामुराबद, विदगाव, यावल, चोपडा , भोकर, भादली, किनोद, सावखेडा, आमोदा, पळसोद आदी गावासाठी वाहतूक सुरू होती व तालुक्यातील लोकांसाठी तो मार्ग सोईस्कर होता. मात्र पुलाचे काम सुरू होणार असल्याने वरील गावांसाठी पर्यायी मार्ग शोधावा लागणार होता.
सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी नगर मधील लाखो लोकांचा शहराशी संपर्क तुटणार असल्याने त्यांनाही येण्याजाण्यासठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे अपरिहार्य होते. तिकडील सर्वच रहिवाशीयांचा काही न काही कारणास्तव शहराशी संपर्क असतोच. विद्यार्थी शाळेत जाणे, बायका -महिलांना बाजारहाट ,पुरुष मंडळींना व्यवसाय, नोकरी, कामधंदा यासाठी शहरात येण्याजाण्यासाठी पुलाशिवय दुसरा पर्यायी मार्ग नव्हताच . होता तो तहसील कार्यालयाकडून रेल्वे मार्ग ओलांडून येण्याचा व अत्यंत धोक्याचा.
परंतु रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी त्याबद्दल गांभीर्याने कोणताच विचार न करता जुना पूल तोडून टाकला.लोकांची प्रचंड गैरसोय केली.त्याबद्दल समाजसेवक, नगरसेवक, स्थानिकांनी आंदोलन केले , रस्ते रोखले, रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला .उपोषण केले, धरणे धरलीत , ठिय्या आंदोलन केले , परंतु सारे व्यर्थ ठरले लोकांना गैरसोईच्या खाईत लोटून पूल पाडण्यात आला व पुढे पूल कसा असावा तो पूर्वीप्रमाणे असावा, टी आकाराचा की वाय आकाराचा यावर वाद झाला. तरीही पूल टी आकाराचा करण्यावर एकमत झाले नी काम सुरू झाले.
नवीन पूल साधरण दोन वर्षात पूर्ण करू असे सांगण्यात आले होते. पुलाचे काम कोणत्या मक्तेदारस दिले हा विषय महत्वाचा आहे. खरा मक्तेदार कोणीही असो पण पुलाचे काम तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचे संबंधित खटोड यांना दिल्याचे सांगितले जाते. या पुलाच्या कामासाठी बर्याच अडचणी आल्या सद्य स्थितीत साधरण अर्धे काम झाले असावे व पुलाच्या आकाराचा वाद समोर आला आहे.त्यामुळे आणखी किमान दीड ते दोन वर्षे तरी पूल पूर्णत्वास येणार नसल्याचे चिन्ह आहे. समाजसेवक,नगरसेवक आणि स्थनिकांच्या त्रिकोणात हा पूल अडकण्याची चिन्हे आहेत.परिणामी नागरिकांना आणखी बराच त्रास सहन करावा लागणार आहे.
खरे पाहता पुलाचे बांधकाम टी आकारात करण्याची मंजुरी झाली होती त्यास निधी सुद्धा मंजूर होता.मात्र पुलाचे सद्य स्थितीत जुन्या पुलाप्रमाणे म्हणजे एल आकारात निर्माण होत असल्याचे समोर आल्याने वाद पुन्हा पेटला आहे. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी त्यावर बोट ठेवले असून स्थनिकांच्या सोइ प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या टी आकारा प्रमाणे पूल बांधावा असा त्यांचा आग्रह आहे व तो वास्तव आहे.
प्रश्न पडतो की ,जर पुलाचे बांधकाम टी आकाराचे मंजूर आहे व त्यासाठी निधी सुद्धा मंजूर आहे तर मग पुलाचे बांधकाम जुन्या एल असकाराचे होते कसे आहे ? त्यासाठी कोणी परवानगी दिली ,कोणाची मान्यता घेतली,स्थानियक लोकांना विश्वासात घेतले का ? परस्पर निर्णय कोणाच्या सल्ल्याने घेतला गेला .याची उत्तरे शोधली पाहिजे.
शिवाजी नगर परिसरात भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम सुरू असताना स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या निदर्शनात हा प्रकार आला व भांडाफोड झाला आहे. ज्या जागेवर टी आकाराच्या पुलाचे खांब (पिलर) येणार होते त्याच जागी भियारी गटार कशी? हा प्रश्न दारकुंडे यांना पडला व त्यांनी गटाराचे खोदकाम रोखून धरले . त्यातूनच पूल जुन्या एल आकाराचा होत असल्याचे सत्य समोर आले असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एल आकाराचा पूल झाल्यास ते शिवाजी नगर वासीयांसाठी त्रासदायक ठरेल असे चित्र आहे. कारण शिवाजी नगरात जाणार्‍या लोकांना पूल संपणार असलेल्या जुन्या कानळदा रस्त्यावर जाऊन परत माघारी फिरावे लागणार आहे.मंजूर टी आकाराचाच पूल सार्यांसाठी फायद्याचा ठरेल. त्यामुळे मंजूर झाल्याप्रमाणे पूल टी आकाराचा झाला पाहिजे असे सार्यांचेच म्हणणे आहे. उगीच वाद वाढू नये अशी स्थानिकांची इच्छा आहे. आम्ही आजपर्यंत सहन केले आणखी पुढे सहन करण्याची आमची शक्ती नाही ती सहनशक्ती संपली म्हणजे आम्हाला पुन्हा रस्त्यावर यावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here