चोपडा : प्रतिनिधी
शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत सातपुडा पर्वतात हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. काही भ्रष्ट वन कर्मचाऱ्यांच्या संमतीने सर्रास वृक्षतोड करण्यात येऊन संपूर्ण जंगल उजाड करण्याचा घाट घातला जात आहे. हे ताबडतोब थांबावे व वृक्षतोड करुन तयार करण्यात आलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेमार्फत सहाय्यक वनरक्षक हडपे यांना देण्यात आले.
सातपुडा वनातील गट क्र.197/198 मध्ये 40 हेक्टर पेक्षा जास्त जंगलातील वृक्षतोड करून नवाड जमीन तयार करून तुरीचे पीक घेण्यात आले आहे. त्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच वनविभागाकडून वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या रोपांची नासधूस ही कोणाच्या कृपेने करण्यात आली? काही वनअधिकारी व कर्मचारी यांनी आदिवासींकडून आर्थिक व्यवहार करून जंगल तोडीस संमती दिलेली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, सचिन डाभे, राजेंद्र पाटील, विनोद धनगर, विवेक गुजर, रविंद्र पाटील, सुकलाल धनगर, राजेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.