जळगाव, प्रतिनिधी । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ह्या कोरोना सारखी आपत्ती असल्याने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जळगावची साडेसहा वर्षाची लेक शिवांगी काळे हिला प्रदान करण्यात आला आहे.
आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्या जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकलीला आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. ५ जानेवारी २०२१ रोजी एक घटना घडली. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले. यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले. जळगावच्या या लेकीने बहादूर कार्य करून पुरस्कर मिळवत जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारचे प्रमाणपत्र देण्यासाठी पहिल्यांदाच ‘ब्लॉक चेन’ टेक्नोलॉजी पद्धतीचा वापर केला गेला आहे.