शरद पवारांचे मोठे वक्तव्य ; ‘या’ निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह !

0
2

मुंबई :- प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र स्वबळावर निवडणूक, युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने  एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रिपणे निवडणुका लढवायच्या की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी आपले मत मांडले आहे. या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की, प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, आपण सरकार एकत्र चालवतो. त्यामुळे या निवडणुकीसाठीही आघाडी करावी. मात्र या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही, असे पवार म्हणाले.

 

आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. एकमेकांची मतं जाणून घेतल्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे पवार म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितले की, जी निवडणूक थांबवली होती, ज्या टप्प्यात थांबवली होती, तिथून सुरू करा. काही ठिकाणी याद्या तयार नाही. काही ठिकाणी हरकती मागवायच्या आहेत. हरकती मागितल्यावर एक महिना जातो. त्यानंतर वॉर्डरचना होते. त्याला एक महिन्याचा कालावधी जातो. त्यानंतर महिला, मागासवर्गीयांसाठी राखीव वॉर्ड रचनेसाठी एक महिना जातो. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी अडीच ते तीन महिने लागतील असे पवार म्हणाले. त्यामुळे १५ दिवसांत निवडणुका जाहीर करणं शक्य नाही, असेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी आरक्षित जागा होती, तिथे आरक्षित वर्गाचा उमेदवार देणार, असे आपण राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितले होते, असे पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here