विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
काढणीवर आलेल्या मका पिकाला वादळी वाऱ्याने मुख्य वीज प्रवाहाची वाहिनी दुसऱ्या वाहिनीला स्पर्शून गेल्याने अचानक झालेल्या शोर्ट सर्किटमुळे दोन आकार क्षेत्रातील मका पिकाला आग लागून शंभर टक्के जळून खाक झाल्याची घटना जरंडी शिवारात उघडकीस आली आहे याप्रकरणी वीज मंडळाच्या महावितरण विभागाकडून घटनेचा पंचनामा केला आहे.या घटनेत शेतकऱ्याचे तब्बल दोन लाख रु चे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मधून हाती आले आहे.मात्र महसूल विभागाने घटनास्थळी अद्यापही भेटी दिलेल्या नाही.
सोयगाव परिसरात तीन दिवसापासून वादळी वाऱ्याचे वातावरण तयार झालेले आहे या तीन दिवसात वादळी वारा आणि वावटळ सुरु झाल्या असल्याने या वादळी वाऱ्याने रोहित्राच्या मुख्य वीज वाहिनी दुसऱ्या वीज वाहिनीला स्पर्शून गेल्याने झालेल्या घर्षणातून शोर्ट सर्किट होवून आगीचे लोळ शेतातील काढणीवर असलेल्या मक्यावर पडल्याने आगडोंब उसळला होता या आगीत जरंडी शिवारातील प्रकाश पांडुरंग पवार यांच्या गट क्रमांक-२४४ मध्ये मोठी आग लागल्याने शेतालाही आग लागली तर या आगीत दोन एकर वरील काढणी वर आलेला मका आणि मक्याचा चारा जळून खाक झाला आहे.दरम्यान परिसरातील शेतकयांच्या लक्ष्जात हा प्रकार येताच शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीची तीव्रता अधिक असल्याने कापणी करून ठेवलेला संपूर्ण मका जळून खाक झाला आहे.ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
महावितरणचं शोर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कोणताही लाभ मिळत नसल्याचे शेतकऱ्यांना अनुभवास आलेले असल्याने महसूल विभागाने तरी यामध्ये मध्यस्थी करून आपत्ती निवारण विभागाचं निकषातून या नुकसानीला भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.महावितरणच्या शोर्ट सर्किटच्या घटनांमध्ये औरंगाबाद येथील विद्युत निरीक्षक च्या पाहणीनंतर नुकसानीच्या तीव्रतेवर भरपाई ठरविण्यात येते त्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कडून डझनभर कागदपत्रे मागविण्यात येतात या मध्ये शेतकरी तंग होवून जातो.