चोपडा, प्रतिनिधी । सातशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जे का रंजले – गांजले , त्यासी म्हणे जो आपुले…असे सांगून निस्वार्थ समाजसेवेची शिकवण दिली .रोटरी क्लब हि संस्था आणि त्यांचे सदस्य खऱ्या अर्थाने या निस्वार्थी सेवेचे मोल जोपासत , समाजाला प्रेम आणि विश्वास देत सेवाभावी वृत्तीचे विधायक असे सामाजिक कार्य करीत आहेत असे गौरवोद्गार चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी काढले. ते रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित चोपडा शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचारी बांधवांसाठी मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिर प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पोलिस दलात कमी मनुष्यबळ , त्यात २४ तास कर्तव्य ,कामाचा ताण – तणाव ,जेवणाची वेळ निश्चित नसणे अशा विविध कारणांमुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यात विविध आजारांसोबत मधुमेह व हृदयरोग इत्यादी आजारांची वाढ होताना दिसून येत आहे. रोटरी क्लब ऑफ चोपडाने पोलिस बांधवांसाठी मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी पोलीस दलातर्फे आभार व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक ,आरोग्य इत्यादी कार्यक्रम व उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून चोपडा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना २४ तास कर्तव्य, कामांचा ताण , कमी मनुष्यबळ , जेवणाची वेळ निश्चित नसणे असे विविध प्रकारच्या समस्यांना नेहमीच सामोरे जावे लागते आणि त्यातूनच विविध आजार उद्भवत असतात. हया सर्व बाबींचा विचार करून पोलिस बांधवांसाठी मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केल्याचे रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले आपल्या मनोगतात म्हणाले.
सदर शिबिरांत ६० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी डॉ हेमंत पाटील यांनी केली. सदर शिबिरात ६० पैकी १० पोलिस कर्मचाऱ्यांना रक्तदाबाची सुरूवात झाल्याचे आढळून आले.
डॉ हेमंत पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, मधुमेह झाला की हृदयरोग होतोच इतकं एकमेकांशी जवळचं नातं आहे. पण हे दोन्ही विकार का होतात ते समजून घेऊन ते टाळण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी करायलाच हव्यात असे ते म्हणाले .मुळातच मधुमेह आणि हृदयरोग हि सख्खी जुळी भावंडे आहेत.वैद्यकीय भाषेत मधुमेह झाला म्हणजे हृदयरोग झाला असे समीकरणच मांडले जाते .मधुमेह वाईट ,पण त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड नाही. अशक्य तर नाहीच नाही. याची खूणगाठ एकदा घट्टपणे मनाशी बाळगली की मधुमेह आणि हृदयरोग या जुळ्या भावंडांची ताटातूट करण्यात काहीच अडचण येणार नाही म्हणून वेळीच खबरदारी घेऊन जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सदर शिबिर प्रसंगी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले, सचिव प्रविण मिस्त्री , एनक्लेव चेअर एम डब्ल्यू पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. शेखर वारके ,नितीन अहिरराव ,रुपेश पाटील ,पृथ्वीराज राजपूत, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी ,अरुण सपकाळे, विपूल छाजेड , व्ही एस पाटील, डॉ. अमोल पाटील, शिरीष पालीवाल, निखिल सोनवणे, प्रदीप पाटील आदी रोटरियन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर आभार रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सचिव प्रवीण मिस्त्री यांनी मानले…..