लंडन : वृत्तसंस्था
पुतीन यांचे आचारी म्हणून परिचित असलेले येगवेनी प्रिगोजहिन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यासह 23 जणांच्या हत्येसाठी कुख्यात व्हॅगनर ग्रुपच्या किलरला सुपारी दिली आहे. प्रिगोजहिन रशियाचे अब्जाधीश आहेत. रशियात त्यांची अनेक हॉटेल आहेत. पुतीन आपल्या अनेक पार्ट्या प्रिगोजहिन यांच्या हॉटेलमध्ये आयोजित करतात.प्रिगोजहिन उद्योजक असले तरी त्यांची पुतीन यांचे आचारी अशी ओळख आहे. प्रिगोजहिन यांनी मोठी रक्कम देऊन व्हॅगनर ग्रुपला युक्रेनला पाठवले आहे.पाच महिन्यांपासून 400 मारेकरी युक्रेनमध्ये मुक्काम ठोकून असल्याचे सांगितले जाते. हे मारेकरी बेलारूस मार्गे युक्रेनमध्ये घुसले आहेत. आतापर्यंत सुपारी किलर दक्षिण आफ्रिकेत होते परंतु युक्रेनमध्ये दडून बसलेल्या मारेकऱ्यांची एकूण संख्या 4 हजारांवर आहे. युक्रेनच्या सुरक्षा दलाने काही ठिकाणी अटकेची कारवाई केली आहे.
वीस वर्षांच्या काळात युद्धात
10 लाख लोकांचा मृत्यू
गेल्या वीस वर्षांत युद्धामुळे किमान 10 लाख लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर 600 लाख कोटी रुपये खर्च झाले. ही रक्कम भारताच्या जीडीपीहून 2.9 पट जास्त आहे. 85 देशांना युद्धाचा फटका बसला आहे. युद्धात अफगाण, इराक, येमेन, सिरियाची हानी झाली.
संपूर्ण कॅबिनेट निशाण्यावर
व्हॅगनर ग्रुपच्या निशाण्यावर राष्ट्रपती जेलेन्स्की यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आहे. शिवाय महापौर व्हिटाली क्लिटशॅको व त्यांचे बंधू व्लादिमीर क्लिटशॅको देखील निशाण्यावर आहेत. दोन्ही बंधू बॉक्सिंग चॅम्पियन आहेत. कीव्हमध्ये संचारबंदी जाहीर केली होती.
इशाऱ्याची प्रतीक्षा
सूत्रांच्या म्हणण्यानुसार व्हॅगनर सुपारी किलर युक्रेनमध्ये पसरवण्यात आल्यानंतर रशियाचा संपूर्ण कट तयार आहे. व्हॅगनर ग्रुपचे वरिष्ठ सदस्य म्हणाले, पुतीन जेलेन्स्की यांच्यासोबत चर्चेचा मुद्दा मांडतील. परंतु त्यातून तोडगा निघणार नाही. नंतर व्हॅगनरची टोळी पुतीन यांच्या इशाऱ्यावर सक्रिय होईल. सुपारीची रक्कम मिळाल्यानंतर सुपारी किलरला युक्रेनमधून सुरक्षित मार्गे बाहेर काढले जाईल.
हिटलरनंतर पहिल्यांदाच कीव्हवर हल्ले
युक्रेनची राजधानी कीव्ह आणि खारकीवमध्ये रशियाच्या सैन्याने बॉम्बहल्ला केला. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याने हल्ला केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच असे हल्ले झाले. दोन्ही शहरांत त्यानंतर पहिल्यांदाच अशी हिंसा पाहिली. हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला. आता ऑस्ट्रेलिया युक्रेनला 562 कोटी रुपये देणार आहे. युरोपीय देश युक्रेनला 75 लढाऊ विमाने देतील.
ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉन्सन यांना मंगळवारी पत्रकाराच्या रोषाला सामोरे जावे लागले. रशियन हल्ल्यात लहान मुले मारली जात आहेत. हे हल्ले रोखण्यात अपयश आले आहे. तुम्ही घाबरट आहात, असा आरोप महिला पत्रकार डारिया कालेनियुक यांनी केला. बोलताना त्या भावूक झाल्या होत्या. डोळ्यात अश्रूही आले होते.
हत्या करणारा ग्रुप व्हॅगनर
व्हॅगनर हा भाड्याने हत्या करणारा रशियन ग्रुप आहे. रशियातील माफिया ते चालवतात. 2014 मध्ये क्रिमियात रशियन हल्ल्यात व्हॅगनर ग्रुप युक्रेनच्या डोनबासमध्ये रशियन सैन्यासाठी काम करत होता. सिरियन युद्धातही मोठी रक्कम घेऊन या ग्रुपने हत्या केल्या होत्या. चेचेन्या युद्धातही या ग्रुपने भाग घेतला होता. हा ग्रुप अंमली पदार्थ, शस्त्र तस्करी, अपहरण, हप्ते वसुलीही करतो.
पुतीन कुटुंबिय सुरक्षित ठिकाणी
कोणत्याही आण्विक हल्ल्यापासून बचावासाठी पुतीन यांच्या कुटुंबाला सायबेरियातील बंकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. सायबेरियात त्यासाठी विशेष भूमिगत शहर तयार करण्यात आले आहे, असा दावा राजकीय विश्लेषक व मॉस्कोतील माजी प्रोफेसर वालेरी सोलोवी यांनी केला आहे. अल्ताई पर्वतावर तयार केलेल्या अणुबाँबप्रतिबंधक बंकरमध्ये पुतीन कुटुंबाचा मुक्काम आहे.