भुसावळ : प्रतिनिधी
या जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू चि शोधूनी पाहे, समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकाच्या अर्थ कथन करत संसारात जगतांना ज्यांनी मोह आणि आसक्ती टाकत भगवंतास शरण गेला त्यास संसारात सुख प्राप्त होते, असे उद्बोधन हभप दुर्गादास महाराज खिर्डीकर यांनी केले. भुसावळ येथील वेडीमाता मंदिराजवळील आराधना कॉलनीतील स्व.सदाशिव एकनाथ सावकारे यांच्या वर्षश्राध्दनिमित्त किर्तनात केले.
हभप दुर्गादास महाराज यांनी उद्बोधनात एकनाथ महाराजांच्या अभंगाचा आधार घेत जन्म-मृत्यूबाबतच्या वास्तव्याबाबत उपस्थितांना अवगत केले. यावेळी श्राध्द कर्माचे महत्त्व उदाहरण देवून पटवून देतांना ते म्हणाले की, जन्म-मृत्यूचा फेरा अटळ आहे. जुना देह गळून पडतो तेव्हा आत्मा नविन देह धारण करतो त्याला मृत्यू असे म्हणतात. त्यांनी यावेळी संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगाचा आधार घेत जन्ममृत्यूच्या फेऱ्याबाबत कथन केले. वैदीक धर्मामध्ये वर्षश्राध्द केले पाहिजे, हे वैदीकांची परंपरा आहे. पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण या फेऱ्यातून मुक्त व्हायचे असेल व पुढील जन्मात मृत व्यक्तीला पोटभर अन्न पाहिजे असेल, सुख-समाधान पाहिजे असेल त्यासाठी त्यांच्या वारसांनी श्राध्द कर्म केले पाहिजे. या श्राध्द कर्माच्या संदर्भात दुर्गादास महाराज यांनी सविस्तर उदाहरण देत श्राध्द कर्माचे महत्त्व पटवून दिले. ते म्हाणाले की, ज्यांच्या मानव वंशातले लोक श्राध्द कर्म करत नाही त्यांचे पतन होते. असे सांगत असतांना त्यांनी संतश्रेष्ठ तुकोबाराच्या पितृ आशिर्वाद देती या अभंगाद्वारे मार्गदर्शन केले. तसेच श्राध्द कर्म केल्याने मानव वंशातील त्यांच्या वारसांना पित्रांचे आशिर्वाद प्राप्त होतात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज, संतश्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंगातील ओवींमधून भाविकांना संबोधित केले. सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहेत यावर त्यांनी जनजागृतीपर संदेश देत सांगितले की, पक्षांसारखे अनासक्त रहा, आसक्त राहू नका, मोह टाळत भगवंताच्या शरणी गेल्यास संसारात सुखाची प्राप्त होते. याचबरोबर त्यांनी गाढवाच्या प्रामाणिकपणाचे उदाहरणही अत्यंत सोप्या शब्दात मांडले. ते म्हणाले की, गाढवाचे दोन गुण अत्यंत महत्त्वाचे आहे. एक-तो कितीही थकला असला तरी पाठीवर भार ठेवल्यानंतर तो ते भार वाहून नेतो. भार वाहून नेतांना तो कुठलीही पर्वा करत नाही. तसेच मालकाने खाऊ घातलेल्या अन्नावर तो नेहमी संतुष्ट असतो, असा संतुष्ट प्राणी म्हणजे गाढव.जीवनात किती संपत्ती जमा केली, त्यापेक्षा तुमच्या जीवनात किती भय आहे हे महत्त्वाचे आहे. जगात तोच सुखी ज्याला भय नाही. आणि जो भगवंताला शरण जातो त्याचे भय नष्ट होते, असे प्रबोधन हभप दुर्गादास महाराज यांनी यावेळी केले. यावेळी किर्तनात विणेकरी म्हणून दगडू जंजाळे व मृदुंगवादक म्हणून हर्षल महाराज वाघळूदकर होते. किर्तनाला वेडीमाता भजनी मंडळाच्या टाळकरी मंडळाने सहाय्यता केली. त्यात माधव नेहते, युवराज सरोदे, विष्णू पाटील, मधु महाजन यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी राजेश सावकारे, रुपेश सावकारे, भावेषा सावकारे, समस्त सावकारे परिवार व त्यांचे मित्र परिवाराने परिश्रम घेतले.