माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड : डायटतर्फे ‘सृजनशिल्प’ शिक्षक साहित्यिक सूचीचे प्रकाशन 

0
2
जळगाव – प्रतिनिधी 
साहित्यातून समाजमनाचे दर्शन घडत असते तर आजच्या बालकांमधून उद्याचा समाज घडत असतो. त्यामुळे बालमनावर संस्कार घडवता घडवता समाजाचे दर्शन घडविण्यासाठी आपल्या प्रतिभाशील लेखणीला सतत तेवत ठेवणार्‍या शिक्षक साहित्यिकांचे कार्य अभिमानास्पद आहे. अशा शिक्षक साहित्यिकांकडून सातत्याने संस्कारशील साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी व्यक्त केली.
जळगाव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिनानिमित्त मराठी-विज्ञान सृजनोत्सव 2022 आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. गायकवाड बोलत होते. व्यासपीठावर डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, साहित्यिक अ. फ. भालेराव, मनोहर आंधळे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, विद्या बोरसे, प्रदीप पाटील, शैलेश पाटील आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉ. अनिल झोपे यांनी मराठी-विज्ञान सृजनोत्सव आयोजनामागची भूमिका विशद करून सृजनशील विद्यार्थी व शिक्षक निर्मितीचा हा प्रयत्न असल्याचे नमूद केले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिक्षक साहित्यिकांच्या माहितीची पुस्तिका ‘सृजनशिल्प’ परिचय सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माझ्या लेखनाचा पहिला अनुभव याविषयी अ. फ. भालेराव व मनोहर आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या वर्षी मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून डायटतर्फे आयोजित अभिव्यक्ती व अभिवाचन स्पर्धेतील 25 विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांच्या सूचीचे वाचन अधिव्याख्याता प्रतिभा भावसार यांनी केले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी काम पाहिले होते. तसेच विज्ञानदिनाचे औचित्य साधून डायटतर्फे आयोजित ऑनलाईन व्हिडीओ वक्तृत्व स्पर्धेतील 15 विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांच्या सूचीचे वाचन अधिव्याख्याता विद्या बोरसे यांनी केले. स्पर्धा समन्वयक म्हणून अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी काम पाहिले होते. त्यानंतर भोटा, ता. मुक्ताईनगर येथील जि. प. शाळेची विद्यार्थीनी दीक्षा इंगळे हिच्या डायरी लेखन या उल्लेखनीय कार्याबद्दल तिचा बाल साहित्यिक म्हणून गौरव करण्यात आला. भुसावळ येथील डॉ. नरेंद्र महाले यांची कन्या हंसिका हिचा आदर्श वक्ता म्हणून गौरव करण्यात आला. दीक्षाने उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले तर हंसिकाने रयतेचा राजा या विषयावर वक्तृत्व सादर केले. शैलेश पाटील यांनी ‘सृजनशिल्प’ या शिक्षक साहित्यिकांच्या परिचय सूची निर्मितीमागील भूमिका मांडली. ही सूची संकलन व संपादनाची भूमिका करणारे अधिव्याख्याता शैलेश पाटील, मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील, तांत्रिक सहाय्यक श्यामकांत रूले व गणेश राऊत आणि मुखपृष्ठ व मलपृष्ठ सजावट करणारे सुनील बडगुजर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बेटी बचाव बेटी पढाव या पुस्तकाचे लेखक गोविंद रामदास पाटील यांनी दीक्षा इंगळेला अकराशे रूपये बक्षीस दिले. सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी तर आभार किशोर पाटील यांनी मानले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिक्षक साहित्यिकांच्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करून अवलोकन केले व नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here