जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात गंभीर व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यक असते. मात्र, शहरात शासकीयसह खासगी रुग्णालये फुल्ल झाल्याने बेड शिल्लक नाही. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मोहाडी येथील रुग्णालयात दोन दिवसांत दोनशे बेड सुरू करण्याचे सांगितले आहे. तर महिन्याभरात याच ठिकाणी ८०० बेड तयार करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी महिला रुग्णालयात कामाला गती आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
बेड फुल्ल, रुग्णांचे हाल
तालुकास्तरावर ऑक्सिजनच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना जळगाव शहरात उपचारासाठी दाखल केले जात आहे. मात्र, जिल्ह्याची परिस्थिती पाहता खासगी व शासकीय या दोन्ही ठिकाणी सर्व बेड फुल्ल असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तर काही गरीब रुग्णांकडे खासगीत उपचारासाठी पैसे नसल्याने मृत्यू होत असल्याच्याही घटना घडत आहे.
जिल्हाधिकार्यांच्या सूचना
ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी मोहाडी येथील महिला रुग्णालयात तातडीने एका आठवड्यात दोनशे ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड तयार करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार काम सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात शंभर, दुसर्या टप्प्यात दोनशे असे बेड सुरू करण्यात येणार आहे.हे बेड येत्या दोन दिवसांत रुग्णांसाठी कार्यान्वित होतील तर महिन्याभरात संपूर्ण रुग्णालयात सुमारे आठशे बेड तयार होतील.