महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकत – कुमार केतकर

0
85

मुंबई प्रतिनिधी
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाबवगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचे सरकार येणार हे निश्चित झालेले असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी युपी तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया दिली. तर राज्यातील सरकार अस्थिर होईल का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते असे विधान करत राजकीय खळबळ उडवली आहे.
पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कुमार केतकर यांनी हे वक्तव्य केले आहे. कुमार केतकर आणि भाजपाचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाग घेतलेल्या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर या निवडणुकीच्या निकालांचा काय परिणाम होईल यासंदर्भात चर्चा झाली त्यावेळीच केतकर यांनी हे वक्तव्य केले.
सरकार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का?,” असा प्रश्न जावडेकारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “आम्ही पाडायचे काय प्रयत्न करतोय? शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असंतोष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कागदावर बहुमत आहे, विधानसभेत बहुमत आहे त्यांचे – त्यांचे चालू आहे. आम्ही काय केले पाडायला?,” असा प्रतिप्रश्न केला. यावर “केंद्रीय संस्था पाठवल्याचा आरोप शिवसेनेने केला” असा संदर्भ देण्यात आला. त्यावरही उत्तर देताना जावडेकरांनी, “त्याचा काय संबंध. तुमच्याकडे केंद्रीय संस्था पाठवल्या तरी तुम्ही तुमचं पत्राकिरतेचं काम करत राहाल. कर नाही त्याला डर कशाला? काहीतरी केलं असेल तर माणूस घाबरेल. खरी माहिती देत असाल तर धाड कशाला पडेल,” असे उत्तर दिले.
सरकारला धोका आहे का? असा थेट प्रश्न कुमार केतकर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कुमार केतकर यांनी, “सरकारला धोका स्थापन झाल्यापासून आहे. ईडीवगैरे ते चालवतात. आता नारायण राणे त्यांच्याकडे आले. पण सगळ्या भाजपा नेत्यांची नारायण राणेंविरोधातील भाषणं युट्यूबवर उपलब्ध आहेत. ते भाजपात आल्याबरोबर त्याच्याबद्दलची चर्चा थांबली. मुद्दा असा की जर त्यांना सरकार पाडयचे असेल तर यंत्रणा कशा वापरायच्या हे त्यांना माहितीय,” असेही केतकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here