भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मराठी नाट्यस्पर्धेतील सातत्य कौतुकास्पद पण..

0
2

दीपरंग भुसावळ औष्णिक  विद्युत केंद्र,दीपनगरने राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचा पडदा उघडताच काल संभाजीराजे नाट्यगृहाच्या  रंगमंचावर ‘कूस बदलताना` हे शाश्‍वत प्रेमाचा संदेश देणारे नाटक सादर करण्याचे धाडस केले मात्र विचार  व  तत्वाची ही कूस बदलताना लाभलेल्या संथगतीमुळे या नाटकाचाही  ब्रेकअप  होत गेला व रसिकांनाही ही कूस आल्हाददायक वाटण्याऐवजी पदरी निराशा पाडणारी वाटली.असो.असे असले तरी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र राज्य  नाट्य स्पर्धेत जी सातत्याने हजेरी लावून प्रयत्नांची शिकस्त करीत आहे ती निश्‍चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल.
कथासार
जस जसा काळ बदलतो तस तसे माणसाचे आचार विचार व जीवनशैली बदलत जाते आणि त्यात काळानुसार बदल स्वाभाविकच आहे. बदलत्या आधुनिक काळात जीवनशैली मध्ये माणूस जबाबदारी टाळत स्वातंत्र्य उपभोगण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात तो स्वकेंद्रीत होवून ऐहिक सुखासाठी तो नव नवीन पध्दती स्विकारु लागलाय. त्याचपैकी एक म्हणजे लग्नाशिवाय एकत्र राहणं. म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशीप यामध्ये त्यांना हव तसं जगण्याचं स्वातंत्र्य मिळतं. परंतु असं स्वातंत्र्य उपभोगतांना त्यांच्या मनात जो पारंपारिक व पिढ्यानं पिढ्याच्या रुढीचा पगडा आहे. तो मात्र सुटत नाही. त्यामुळे नात्यामधला सुख दुखाचा गुंता आजही कायम आहे. त्या गुंत्याचे पदर उलगडतांना माणसाचे पाय मातीचेच आहेत हे दिसून येते.
गुणदोषांचा पूर्ण परिचय ही शाश्‍वत प्रेमाची पायरी, त्यात गृहित अपेक्षांना आसक्तीला पूर्णत्वाचे दान मिळाले  नाही तर ते प्रेम आणि त्या प्रेमाच्या आधारावर अवलंबून असलेले परस्पर संबंध हे अत्यंत तकलादु ठरतात.
एक गोष्ट  मात्र नक्की प्रेम हे विश्‍वासाच्या बळावर टिकतं, तडजोडीने फुलत आणि शाश्‍वत बनतं व नात्यांना  दृढ बनवतं. या निर्माण झालेल्या नात्यांना भावनिक व मानसिक आधारही असतो. मग तो आधार शोधून त्याची जपणूक करणं व त्याद्वारे जीवन समृध्द करणं याची रीत प्रत्येकाची वेगवेगळी असते. ती तुमच्या विचारांशी जुळेल किंवा नाही जुळणार मात्र एक आगळावेगळा अनुभव नक्की देईल. काय सांगाव कदाचित तुमच्या विचाराशी कूस बदलण्यास सहाय्यभूत/ मार्गदर्शक ठरेल.
संथ गती ठरली अडसर
भगवान  हिरे लिखित,विजय राठोड निर्मित कूस  बदलताना  या नाटकाचा आशय  चांगला असला तरी त्यास ज्या गतीने व प्रभावीपणे सादरीकरणाची आवश्‍यकता होती त्यात ही टीम  कमी   पडली असली तरी या टीमचे प्रयत्न नजरेआड  करता येणार  नाही.दिग्दर्शक नितीन देवरे व सहाय्यक दिग्दर्शिका ऐश्‍वर्या खोसे हे स्वतः प्रमुख भुमिकेत अडकल्याने ते या नाटकाला पुरेसा न्याय देऊ शकले नसले तरी त्यांच्या ‘विश्‍वास` आणि  ‘इशा` सह शामल जाधव (सॅम्सी),किरण चाटे (सॅली) यांनी आपल्या वाटाल्या आलेल्या भूमिका योग्यपणे साकार करण्याचा प्रयत्न केल्याचे  दिसून आले तर शुभम हुडाने  वठवलेला नवरा व प्रगती गितेने गिरजाच्या रुपात साकारलेली बायको,या दोघांनी मात्र  आपल्या टाईमवर्कने रंगत आणली व  प्रेक्षकानी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसादही दिला ही या नाटकाची जमेची बाजू. विश्‍वास व इशाच्या भूमिकेत नितीन देवरे व ऐश्‍वर्या खोसेने शाश्‍वत प्रेम व  अत्याधुनिक काळातील जीवनशैली वठवतांना रंग भरण्याचा प्रयत्न केला असला तरी ते रंग काहीसे फिके ठरल्याने कूस बदलताना अपेक्षित रंगत येऊ शकली नाही.
कूस बदलताना ब्रेकअप
रमेश वाघ यांचे नेपथ्य साजेसे यासाठी त्यांना स्वप्न्लि पाटील यांचे सहकार्य लाभले तसेच अतुल बऱ्हाटे,संदीप पाटील यांची प्रकाश योजना ठीकठाक.रोशन भगत व गिरीश राऊत यांचे संगीत साजेसे तर समृध्दी खोसे व रोशनी देवरे यांची वेशभूषा यथायोग्य   .त्यांना प्रतिभा बोरोले व शितल जाधव यांचे  सहकार्य लाभले.लव इन रिलेशनशिप या चाकोरीबाहेरील नाट्यकथेत प्रमुख भूमिकेतील विश्‍वास व इशा तसेच सॅली व नॅस्सी यांच्यात वैचारिक मतभेदांमुळे जसे ब्रेकअप होते तसे संथ सादरीकरणामुळे …कूस बदलताना…ही …ब्रेकअप… होत असल्याचे जाणवले. पहिला प्रयोग..तोदेखील दोन तास विलंबाने सुरु झाल्याने कदाचित दीपरंगच्या कलाकारांच्या  टीमचाही हिरमोड   झाला तर नसावा ना,अशी शंका येते कारण या  विलंबामुळे मध्यंतरानंतर  नाट्यगृहातील बरेच  प्रेक्षकही घरी परतल्याचे  दिसून आले. या  स्पर्धेचे  समन्वयक …दीपक… पाटील असले तरी पहिल्याच दिवशी  त्यांच्या टीमचा नियोजनात …अंधार… जाणवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here